कणकवली येथे आयोजित ‘एक दिवस छोट्यांचा‘ अर्थात खाऊ गल्ली उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली येथे आयोजित ‘एक दिवस छोट्यांचा‘ अर्थात खाऊ गल्ली उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली.

   कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी शनिवारची सायंकाळ खर्‍या अर्थाने यादगार ठरली. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर आयोजित करण्यात आलेल्या ’एक दिवस छोट्यांचा‘ अर्थात खाऊ गल्ली या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची चंगळ, विविध प्रकारचे खेळ-खेळणी, मिकी माऊस, कार्टून्स, जादूचे प्रयोग सोबत संगीत किलबिल जल्लोष या सार्‍याचा मनमुराद आनंद लुटत छोट्यांनी अक्षरशः धम्माल केली. या उपक्रमाचे उद्घाटन आ. नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यांनी या उपक्रमाबद्दल समीर नलावडे व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक केले.
खाऊ गल्लीच्या या उपक्रमामुळे टेंबवाडी रस्ता ते गणपती सान्यापर्यंत अवघा परिसर गर्दीने गजबजून गेला होता. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल दुतर्फा लागले होते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकानेही होती. तसेच बच्चे कंपनीसाठी खास गोल फिरणार्‍या गाड्या, झोपाळे असे विविध प्रकारचे खेळही होते. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी यासाठी गेल्या काही वर्षापासून सातत्याने समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही या उपक्रमाला लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगरसेवक अभि मुसळे, किशोर राणे, संजय कामतेकर, बंडू गांगण, रविंद्र गायकवाड, अण्णा कोदे, माजी नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, प्राची कर्पे, साक्षी वाळके, प्रतीक्षा सावंत, राजू गवाणकर, शिशिर परुळेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई आदी उपस्थित होते.
शनिवारी सायंकाळी गणपतीसाना परिसर लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. उद्घाटनापूर्वी लहान मुलांनी पन्नास रुपयाचे कुपन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुलांनी विविध खेळ खेळून कार्टून सह सेल्फी पॉईंटवर रेंगाळत खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. मिकी माउस, छोटा भीम, डोरेमॉन अशी 6 कार्टून्सने लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्यासोबत धम्माल केली. तसेच लहान मुलांना प्रश्न विचारून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. त्याचप्रमाणे मुलांसाठी लकी ड्रॉ काढून बक्षिसेही दिली.