जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन २७ ऑक्टोबर रोजी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन २७ ऑक्टोबर रोजी

 

सिंधुदुर्गनगरी

 

    ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. मूळ कार्यक्रम 20 ऑक्टोबर रोजी होणार होता. मात्र त्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर झाल्याने दिनांकात बदल करून हा कार्यक्रम 27 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त आणि पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे.

महिलांसाठी प्रभावी व्यासपीठ

       राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि समान संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘महिला लोकशाही दिन’ साजरा केला जातो. संबंधित सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.या उपक्रमाद्वारे महिलांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण, तक्रारींचे निराकरण आणि न्याय मिळविण्यासाठी मदत मिळते.

अर्ज कसा करावा?

     महिलांनी आपल्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे उपलब्ध आहेत.अर्ज विहित नमुन्यात असावा आणि तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असावी. न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा किंवा आस्थापना विषयक बाबी, अपूर्ण अर्ज अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय दिलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही शिणगारे यांनी स्पष्ट केले आहे.