वेंगुर्ला येथे ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरा

वेंगुर्ला
इस्लामचे संस्थापक पैगंबर मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात सिंधुदुर्गात साजरा करण्यात आला. या मंगल दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पैगंबर मोहम्मद यांच्या शांतता, सहिष्णुता आणि मानवतेच्या शिकवणींचे स्मरण करून त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यात आले. अनेक ठिकाणी सरबत आणि मिठाई वाटून शुभेच्छांचे आदानप्रदान करण्यात आले. या मंगल दिनानिमित्त विविध सामाजिक संस्थांनी सामाजिक उपक्रम राबविले. यानिमित्त अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या शांतता आणि बंधुत्वाच्या शिकवणींचे महत्त्व विशद केले.सर्व धर्मीयांबद्दल आदर राखणे, गरजूंची मदत करणे आणि समाजात सौहार्द निर्माण करणे या त्यांच्या प्रमुख शिकवणींचे स्मरण करण्यात आले.
यावेळी वेंगुर्ला शहरातील कॅम्प मुस्लिमीन जमातच्या पुढाकाराने 'शरबत ए मोहब्बते' कार्यक्रम गवळीवाडा तिठा येथे पार पडला. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी या कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मुस्लिम बांधवांतर्फे श्री. ओतारी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जमातुल मुस्लिमीन वेलफेयर सोसायटी कॅम्प मस्जिद अध्यक्ष नेहाल शेख, सेक्रेटरी इम्रान शेख, खजिनदार रफिक शेख तसेच अल्ताफ शेख, अशफाक सय्यद, रमीज शेख, अल्फाज शेख, अरहाण शेख, अरजाण शेख, दिगंबर जगताप, प्रीतम सावंत, दिनेश गवळी, गणेश जगताप, ॲड. प्रसाद बाविस्कर आदी उपस्थित होते.