राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ६ रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

सावंतवाडी.
बपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रम सुरु करण्याचा निर्धार भाजपाने केला. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून, विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी सहा रुग्णवाहिका देऊन खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घेतले आहेत.गेले सहा महिने ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यासाठी माझ्या कडे आग्रही आहेत.भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न विशाल परब करीत आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्याचे काम ते करत आहेत. राजकारणापेक्षा सेवावृत्तीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे कौतुक करतो. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सावंतवाडी येथे केल. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा दिनी सावंतवाडी मतदार संघातील जनतेसाठी स्वखर्चाने सहा रुग्णवाहिका दिल्या. त्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज गुरुवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी येथे मोती तलावाच्या काठावरील स्वर्गीय शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्या जवळ मोठ्या दिमाखात करण्यात आला. यावेळी चव्हाण बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पालकमंत्री चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर वाढदिवसानिमित्त महिलांनी पालकमंत्री चव्हाण यांचे औक्षण केले. केक कापून चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मांद्रा गोवा विधानसभेचे आमदार जीत आरोलकर, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, अॅड. अनिल निरवडेकर, विशाल परब यांच्या पत्नी सौ. वेदिका परब, वडील प्रभाकर परब, दिलीप भालेकर, मनोज नाईक, राजू बेग, केतन आजगावकर, राजू राऊळ, अमेय पै व भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्यसेवा बळकट व्हायला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ज्या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे त्या ठिकाणी डॉक्टर दिले जातील. जिल्ह्यात अजून दहा ते बारा आरोग्य केंद्र प्रस्तावित आहेत. रुग्णवाहिका देणे हे विशाल परब यांनी उचललेले सर्वात मोठे पाऊल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार अनेक विकास कामे करीत असून, जनतेसाठी अनेक योजना या सरकारने राबविल्या आहेत. लाडकी बहीण योजने बरोबरच अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांना गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. अशा अनेक योजना असून आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे चव्हाण म्हणाले.यावेळी विशाल परब म्हणाले, आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आमचे मार्गदर्शक व जिल्ह्याचे नेतृत्व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा होत आहे. या जिल्ह्यात पंधरा- वीस वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्ष होता. मात्र जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात भाजपचा वटवृक्ष करण्याचे काम रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. त्याचप्रमाणे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी पक्षात तयार केले आहेत. आज जरी मी सहा रुग्णवाहिका सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला देत असलो तरी 1914 साला मी एक लहान रुग्णवाहिका माणगाव येथे आणली होती. आज पर्यंत त्या रुग्णवाहिकेमुळे दोन हजार रुग्णांचे प्राण वाचले. या रुग्णवाहिकांमुळे आता हजारो लोकांचे प्राण वाचतील. या रुग्णवाहिकांचा कार्यक्रम थाटामाटात केला म्हणून माझ्यावर काही लोक टीका करत आहेत. पण मी अभिमानाने सांगतो हजारो लोकांचे जीव वाचवण्याऱ्या रुग्णवाहिकांचा कार्यक्रम हा मी थाटामाटातच करणार. माझ्यावर कोणी किती टीका केली व माझे वाईट चिंतीले तरी दुसऱ्याचे मी नेहमी चांगले चिंतीतो. त्या सर्वांचे देवानी चांगले करावे असेच मागणे मी देवापुढे मागतो, असे विशाल परब म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.अनिल निरवडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.