राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष लेख.....सेवा, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक

"मरणाच्या छायेत उभा असताना, कुणी हात द्यावा आणि पुन्हा श्वासात रंग भरावा, तोच खरा देवदूत" मानवाच्या जीवनात संकटाचे वादळ जेव्हा घोंगावत असते, तेव्हा आशेचे किरण घेऊन येणारा हा ‘जीवनरक्षक’–डॉक्टर, समाजाचा खरा आधारस्तंभ आहे. डॉक्टर हा शब्दच मुळात ‘विश्वास’ आणि ‘दया’ यांच्या समानार्थी आहे. आज १ जुलै, राष्ट्रीय डॉक्टर दिन, म्हणजेच या देवदूतांचा सन्मान करण्याचा, त्यांच्या त्यागाची जाणीव करून देणारा दिवस!", डॉक्टर केवळ औषधांचा व्यापारी नव्हे, तर तो आहे वेदनेवर फुंकर घालणारा माणूस. आपल्या जन्माच्या पहिल्या क्षणापासून ते अखेरचा श्वासांपर्यंत प्रत्येक टप्प्यांवर डॉक्टर आपल्या सोबत असतो. आईच्या कुशीतून बाहेर पडणाऱ्या बाळापासून ते हॉस्पिटलपुर्ती मर्यादित नसते, तर समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी ते अहोरात्र झटतात. कोविड –१९ सारख्या महामारीत जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी आपली सेवा दिली आणि लाखो जीव वाचवले! मात्र, या पेशाची एक काळी बाजूही आहे, समाजात डॉक्टरांकडे देवदूत म्हणून पाहिले जाते, पण अनेकदा त्यांच्यावर अन्याय होतो–रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले, चुकीच्या अपेक्षा, आणि काही ठिकाणी लालसेमुळे निर्माण झालेला अविश्वास. काही डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण समाजात डॉक्टरांविषयी शंका निर्माण होते. पण बहुसंख्य आजही आपल्या शपथीप्रमाणे निस्वार्थपणे सेवा देतात. डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय नाही, तर ती आहे सेवा, त्याग आणि माणुसकीची शपथ! आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील डॉक्टरांचे आभार मानावेत, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवावी आणि त्यांच्याविषयी आदर बाळगावा.
जीवनाच्या रणांगणात दिव्य दिप जळतो...
दुःखाच्या अंधारात, आशेचा किरण फुलतो...
हातात औषधांची शक्ती, डोळयात करुणेची जाणीव...
रुग्णांच्या वेदनांना, देतो नवा जीव..
रात्रंदिवस जागता, कधी न थकता...
कर्माची पूजा, मनोभावे करता...
हृदयात संवेदना, ओठांवर दिलासा...
माणुसकीचा सागर, त्यांच्यात वाहता...
कधी आईसारखी माया, कधी वडिलासारखा आधार...
डॉक्टर म्हणजे देवाच्या रुपातील, खरा अवतार...
रक्त, घाम, अश्रू, सगळ वाहून घेतात...
रुग्णांसाठी स्वतःला, पूर्णपणे वाहतात...
त्यांच्या स्पर्शाने जखमा भरतात...
त्यांच्या शब्दांनी हिम्मत मिळते...
जीवनाच्या या प्रकाशात, डॉक्टरांचं अस्तित्व, अमूल्य ठरते...
सन्मान त्यांना, सलाम त्यांना...
ज्यांनी जीवदान दिल, अशा हजारोंना...
जगण्यास नवा अर्थ, देणाऱ्या डॉक्टरांना ...