राज्यात मान्सून पुन्हा होणार सक्रिय;शनिवारपासून पावसाचा इशारा. मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट जारी.

राज्यात मान्सून पुन्हा होणार सक्रिय;शनिवारपासून पावसाचा इशारा.  मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट जारी.

मुंबई.

  काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान पुढील ४८ तासात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे आणि रायगडसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
   शुक्रवारी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रविवारी विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा हंगाम मागे पडू लागल्यानं महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्यानं मान्सूनचा कालावधी संपण्यापूर्वी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
   आयएमडीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होईल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी बरसण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, पुणे आणि आसपासच्या भागातही पाऊस पडेल, असा अंदाज आहे.  महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात २० व २१ सप्टेंबरला जळगावला तर २१ सप्टेंबरला अहमदनगर व सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात २० व २१ सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात २१ व २२ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात व विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.