सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा. राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा.  राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.

वेंगुर्ला.

   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नीतेश राणे आणि अन्य काही व्यक्ती खोट्या बातम्या पसरविणे आणि जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण व्हावे आणि धार्मिक वैमनस्य उभे करणे, कटकारस्थान रचणे, असे उपद्व्याप करीत आहेत. त्यामुळे समाजात अशांतता पसरत आहे. अशा व्यक्तींविरोधात प्रथम खबरी अहवाल घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
  तक्रारीत म्हटले आहे, फेसबूक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून कर्नाटक सरकारबद्दल खोटी बातमी प्रसारित करून दोनसमाजात तेढ निर्माण करणे, मानहानी करणे, शांतता भंग करणे असे अनेक प्रकार होत आहेत. हे लोकप्रतिनिधी खोटी माहिती पसरवून धार्मिक अशांतता निर्माण करीत आहेत. या व्यक्ती महत्वाच्या पदावर असूनही आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यात गंभीर चूक करत आहेत. ही खोटी माहिती ट्विटर, फेसबूक व सोशल मीडियावर समाविष्ट असल्याच्या लिंक व अकाऊंट पत्ते या तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.तसेच एका टीव्ही चॅनेलने केलेल्या सत्यता तपासणीत असे स्पष्ट झाले आहे की, कर्नाटक सरकारने गणेश पूजा बंद केली आहे किंवा गणेश मूर्ती पोलिसांनी जप्त केल्या आहेत, हा दावा खोटा आहे. प्रसारित केलेल्या प्रतिमा मागील एका विनापरवाना आंदोलनाच्या असून गणेश मूर्ती विसर्जनाशी संबंधित नाहीत.
    या प्रकाराबाबत तात्काळ संबंधित सोशल मीडियावरील लिंक व खोटी माहिती त्वरित काढून टाकावी आणि पूढील प्रसारण थांबविण्यात यावे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नीतेश राणे व इतर संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
   वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, सामाजिक न्याय विभागाच्या वेंगुर्ला तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अनुराधा वेर्णेकर, वेगुर्ला तालुका काँग्रेस सरचिटणीस मयूर आरोलकर, आरवली युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश हुनारी, अब्दुल शेख इत्यादी उपस्थित होते.