माजी सैनिक विश्रामगृहावर झाड कोसळून लाखोंचे नुकसान

माजी सैनिक विश्रामगृहावर झाड कोसळून लाखोंचे नुकसान

 

मालवण

 

 

  मालवण येथे कोसळलेल्या मुसळधार पावसात शहरातील बांगीवाडा येथील माजी सैनिक शासकीय विश्रामगृहावर बाजूच्या जागेतील भलेमोठे चिंचेचे झाड कोसळल्याची घटना घडली. यावेळी विश्रामगृहात कार्यरत असणारे कर्मचारी थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत विश्रामगृहाच्या इमारतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील बांगीवाडा परिसरात असलेल्या माजी सैनिक शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या जागेत असलेले चिंचेचे मोठे झाड विश्रामगृहावर कोसळले. यामध्ये छप्पराचे व दोन खोल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावेळी विश्रामगृहातील एका खोलीत कार्यरत असलेले विश्रामगृह अधीक्षक अमर रेवंडकर, कर्मचारी गिरीश वराडकर, गोविंद गोसावी यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही व ते सुखरूप खोलीच्या बाहेर आले.याबाबत माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे यांच्या सूचनेनुसार शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मंडळ अधिकारी पीटर लोबो व दळवी, पोलीस कर्मचारी सुशांत पवार यांनी पाहणी करत पंचनामा केला. या दुर्घटनेत विश्रामगृहाचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.यावेळी सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, क्लार्क प्रसाद राणे, संघटक दळवी, कनिष्ठ सहाय्यक नाठलेकर यांनी विश्रामगृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार, स्वच्छता मुकादम आनंद वळंजू व सफाई कर्मचारी यांनीही पाहणी केली.