कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष ट्रेन.

कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष ट्रेन.

मुंबई.

   कोकणातून गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. मडगाव ते पनवेल या विशेष गाडीची घोषणा कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. १५ सप्टेंबर रोजी ही गाडी सुटणार आहे.
   मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झाली दुरावस्था यामुळे मुंबई ते कोकण यासाठी लागणारा २० ते २५ तासांचा प्रवास या सगळ्याला कोकण रेल्वेची वाहतूक यंदाही मोठा आधार ठरला आहे. कोकण रेल्वे मार्गावर गाड्या काहीशा उशिराने धावल्या मात्र प्रवाशांना प्रवासाचा कोणताही त्रास झाला नाही अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाकडून परतीच्या प्रवासासाठी आलेल्या गाडीला उदंड प्रतिसाद मिळणार हे स्पष्ट आहे. गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण २० एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे.
   गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार मडगाव ते पनवेल मार्गावर दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी विशेष गाडी (०१४२८) सुटेल. पनवेलला ती रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१४२७) पनवेल येथून रात्री अकरा वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ती मडगावला पोहोचणार आहे. करमाळी, थिवी, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव रोड तसेच पेण हे थांबे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या गणपती स्पेशल गाड्याना आरवली रोड तसेच नांदगाव रोड येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.