जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ जवान शहीद.
श्रीनगर.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातून मोठी घटना समोर आली आहे. अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या परिसरात अद्यापही गोळीबार सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या अहलान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलिस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने एका विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर अहलानमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. अजूनही तिथे गोळीबार सुरू आहे.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये ७ ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांच्या काही हालचालींबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाकडून संयुक्त कारवाई करत परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. मागील तीन ते चार दिवसांपासून या भागात दहशतवादीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत होती, अखेर सुरक्षा दलाकडून ऑपरेशन सुरू केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दहशतवादी या भागात घुसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून सतत सर्च ऑपरेशन सुरू आहे. दशहतवाद्यांना ताब्यात घेण्यासाठी सतत शोधमोहिम सुरू असून सतत बदलणारं हवामान, धुकं आणि घनदाट जंगल असा परिस्थितीत सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.