पडेल व पुरळ येथे दीक्षित फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप.
देवगड.
कै. नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ "दीक्षित फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा पडेल नं. १ व जि. प. प्राथमिक शाळा पुरळ कसबा या दोन शाळांमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पडेल येथे डॉ. आरोही ओंकार दीक्षित तर पुरळ येथे युवा आंबा बागायतदार श्रीनिवास मराठे यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
शैक्षणिक सुविधांच्या अभावी होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. त्यांनाही आनंदाने शिक्षण घेता यावे या उदात्त हेतूने दीक्षित फाउंडेशनच्या वतीने शनिवारी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, छत्री, पेन, कंपास पेटी, पेन्सिल असे चांगल्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पडेल जि. प. प्राथमिक शाळा नं.१ येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, देवगड तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीरंग काळे, पडेल सरपंच भूषण पोकळे, माजी सरपंच संजय मुळम, केंद्रप्रमुख अशोक जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच पुरळ कसबा येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, पुरळ सरपंच सौ अनुश्री तावडे, उपसरपंच अनिल पुरळकर, माजी सरपंच सुनील तेली, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुरेश देवळेकर, श्रीराम केळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीक्षित फाउंडेशनच्या वतीने पडेल व पुरळ येथील दोन्ही जि. प. शाळांमधील मधील ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत बोलताना दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दीक्षित म्हणाले, ग्रामीण भागातील होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यावर विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेतील. परिणामी शिक्षणाचा दर्जा सुधारेल व याच शाळांमधील विद्यार्थी एके दिवशी आपल्या आई-वडिलांचे, गावाचे, तालुक्याचे व पर्यायाने देशाचे नाव उज्वल करतील अशी आशा व्यक्त केली. तसेच यापुढेही तालुक्यातील शाळांमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा दीक्षित फाउंडेशनचा मानस आहे असे त्यांनी सांगितले.