कोकण रेल्वे अद्यापही ठप्पच; रूळावरील दरड बाजूला करण्याचे काम सुरू. १४ तासांपासून ट्रेन विविध स्थानकात थांबून; प्रवाशांचे प्रचंड हाल; ७ रेल्वेगाड्या रद्द.
रत्नागिरी.
कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळून माती आल्याने कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. रेल्वेसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. गेल्या १४ तासांपासून रेल्वे गाड्या स्थानकावर उभ्या आहेत. बोगद्यामध्ये दरड कोसळून ती ट्रॅकवर आल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागली. रेल्वे स्टेशनवरून ट्रेन सुरू होण्याच्या प्रतीक्षेत प्रवाशी आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी बोगद्याजवळ शनिवारी दरड कोसळली आहे. त्यानंतर गेल्या १४ तासांपासून रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. कोकण रेल्वे सुरु होण्यासाठी अजुनही काही तास लागणार आहेत. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखलाचे साम्राज्य आहे. जवळपास १०० कामगारांच्या मदतीने ट्रॅवरवरील माती हटवण्याचे काम सुरु आहे. खेड रेल्वे स्टेशनवर काही रेल्वे गाड्या थांबवल्या आहेत.
कोकण रेल्वेकडून सात ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मंगळूरु एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस, सावंतवाडी-मडगाव पॅसेजर ट्रेनचा समावेश आहे. तसेच पाच रेल्वे दुसऱ्या मार्गाने वळवल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली आहे. श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात, मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि १२०५२ रत्नागिरी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत तर सावंतवाडी-दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आली आहे. डाऊन मार्गावरील एलटीटी-त्रिवेंद्रम खेड येथे थांबवण्यात आली आहे. गांधीधाम-नागरकोईल विन्हेरे स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस मडगावमध्ये थांबवण्यात आली आहे. तर एलटीटी मंगळुरू एक्स्प्रेस रोहा येथे थांबली आहे.