तिलारी दोडामार्ग रस्त्यावर भीषण अपघात

तिलारी दोडामार्ग रस्त्यावर भीषण अपघात

दोडामार्ग

 

       दोडामार्ग तालुक्यातील तिलारी-दोडामार्ग रस्त्यावर एक भीषण दुचाकी अपघात झाला. या अपघातात दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
    रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातानंतर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी घटनास्थळाची पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन युवक मृत्यूशी झुंज देत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. रस्त्याचे काम सुरू असताना किंवा रस्ता खराब असताना त्या ठिकाणी साधे सूचनाफलकही लावण्याची तसदी ठेकेदाराने घेतलेली नाही, असे धुरी यांनी म्हटले आहे. संबंधित ठेकेदाराने तात्काळ या मार्गावर आवश्यक ते सूचनाफलक लावावेत आणि रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा या बेजबाबदारपणा विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बाबुराव धुरी यांनी दिला आहे.