तेंडोली-शंभूगिरी मठ थांब्याला एसटी प्रशासनाची मान्यता

तेंडोली-शंभूगिरी मठ थांब्याला एसटी प्रशासनाची मान्यता

 

कुडाळ

 

       कुडाळ-केळुस एसटी प्रवासी मार्गावरील तेंडोली येथील शंभूगिरी मठ थांब्याला एसटी प्रशासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. या थांब्यामुळे मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आणि आवेरे येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांनी या थांब्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. तेंडोली चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी साकव बांधण्यात आला असून त्याचा फायदा मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आणि आवेरे या भागातील नागरिकांना होतो. मात्र, या साकवाजवळ एसटीचा अधिकृत थांबा नसल्याने प्रवाशांना नाहक पायपीट करावी लागत होती. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून तेंडोली ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता, परंतु निवडणुका आणि आचारसंहितेच्या तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेला विलंब होत होता. तसेच अधिकृत थांबा नसल्याने अनेकवेळा एसटी चालक-वाहक येथे गाड्या थांबवत नसत, ज्याचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसत होता.आचारसंहिता संपल्यानंतर निलेश तेंडुलकर यांनी विभाग नियंत्रकांशी प्रत्यक्ष चर्चा करून हा थांबा तातडीने मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यांच्यासह सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी अशोक राणे आणि कुडाळ आगारातील तेंडोलीचे रहिवासी रोशन तेंडोलकर यांनी कणकवली विभाग नियंत्रक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर हा थांबा मंजूर करण्यात आला आहे.सध्या वाहकांकडील तिकीट मशिनमध्ये संगणक प्रणालीचा वापर केला जात असल्याने, शंभूगिरी मठ थांब्याच्या मान्यतेचे पत्र कुडाळ आगार प्रमुखांना प्राप्त होताच संगणकीय प्रणालीत आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. येत्या बुधवारपासून हा थांबा अधिकृतपणे कार्यान्वित होणार असून, यामुळे परिसरातील सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.