जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे जंगलामध्ये लष्कराला सापडला मोठा शस्त्रसाठा.

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे जंगलामध्ये लष्कराला सापडला मोठा शस्त्रसाठा.

जम्मू- काश्मीर.

   जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.याचं पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांकडून पावले उचलली जात आहेत. पोलीस आणि लष्कराकडून सातत्याने गस्त घालण्याच्या मोहिमा सुरू आहेत. दरम्यान, जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे जंगलामध्ये लष्कराला मोठा शस्त्रसाठा मिळाल्याची, माहिती समोर आली आहे. लष्कराने हा साठा जप्त केला आहे. निवडणुकीच्या दरम्यान घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा असल्याची शक्यता यावरून व्यक्त करण्यात येत आहे.
   कुपवाडामधील केरन सेक्टरमध्ये गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शोध मोहीम राबवली होती. यावेळी जंगलाच्या मध्यभागी एका झाडाच्या मुळांमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रे लष्कराच्या हाती लागली आहेत. लष्कराने स्फोटकांचा हा साठा जप्त केला आहे. यात एके- ४७ राउंड, हँड ग्रेनेड, आरपीजी राउंड, इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस आणि इतर युद्धाशी संबंधित सामग्रीचा समावेश आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
   दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील कठुआ-बसंतगड सीमेजवळ बुधवार, ११ सप्टेंबर रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पथकाला माहिती मिळताच चार दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार करण्यात आले. अजूनही सुरक्षा पथकाकडून शोध मोहीम सुरु आहे. तर, गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर लष्कराने ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री लाम आणि नौशेरा येथील नागरी भागात घुसखोरीविरोधी कारवाई सुरू केली होती. या कारवाई दरम्यान लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.