वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध ठिकाणी वृक्षारोपण.

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध ठिकाणी वृक्षारोपण.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान व स्वच्‍छ भारत अभियान या अंतर्गत जनजागृतीसाठी निय‍मितपणे विविध उपक्रम राबविले जातात. या अनुषंगाने माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्‍छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी देशी प्रजातींच्‍या ५०० वृक्षांची लागवड करण्‍यात आली.
   जागतिक तापमान वाढ कमी करण्याच्या उद्देशाने वातावरणातील हवामान बदल  नियंत्रित करण्‍यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे आवश्‍यक आहे. यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण करण्‍यासाठी ‘’कार्बन सिक्‍वेस्‍ट्रेशन’’ ही प्रक्रिया केली जाते.  बांबू, वाळा गवत, शेवगा या पर्यावरण पूरक वनस्‍पती  आहेत ज्‍यांचे पर्यावरणीय, आर्थिक  आणि  सामाजिक फायदे आहेत. बांबू, वाळा गवत, शेवगा यांचे वृक्षारोपण हे उत्‍पन्‍नाचे महत्‍वाचे स्‍त्रोत देखील आहे. या सर्व बाबींचा विचार करुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत निशाण तलाव परिसरामध्‍ये १०० बांबू रोपांची लागवड करण्‍यात आली. तसेच कॅम्‍प येथील नवीन म्हाडा वसाहत शेजारील मैदान, दाडाचे टेंब स्मशानभूमी, आनंदवाडी स्‍मशानभूमी, धावडेश्‍वर स्मशानभूमी या परिसरात बांबू, खैर, जांभुळ, शिवन अशा देशी प्रजातींच्या अंदाजे ४०० रोपांची लागवड करण्‍यात आली. या उपक्रमामध्‍ये वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्‍छता कर्मचारी सहभागी झाले होते.वैभव म्हाकवेकर व सागर चौधरी यांनी वृक्ष लागवड मोहीमेचे सूक्ष्म नियोजन केले.