स्थानिक छोट्या छोट्या उद्योगाना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील : पालकमंत्री रवींद्र चव्हाण. मालवण येथे व्यापारी एकता मेळावा संपन्न; विविध पुस्कारांनी व्यापाऱ्यांचा गौरव.

स्थानिक छोट्या छोट्या उद्योगाना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील : पालकमंत्री रवींद्र चव्हाण.  मालवण येथे व्यापारी एकता मेळावा संपन्न; विविध पुस्कारांनी व्यापाऱ्यांचा गौरव.

मालवण.

   देशातील जीडीपी मध्ये वाढ करण्यात व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे. सिंधुदुर्गसह कोकणातील निसर्ग संपत्तीवर आधारित उद्योग व्यवसायाद्वारे जिडीपी मध्ये वाढ करणे शक्य आहे. म्हणूनच स्थानिक उत्पादनातून बाय प्रॉडक्ट घेण्यासाठी व त्यावर आधारित छोट्या छोट्या उद्योगाना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.या धर्तीवर काजू बोन्डूला योग्य दर मिळवून देणे, त्याच्या अर्कापासून नवीन उत्पादनाची निर्मिती करणे याकडे शासन लक्ष देत आहे त्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण येथे व्यापारी एकता मेळाव्यात बोलताना केले.
   मालवण येथील बोर्डिंग मैदानावर आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्याच्या दुपारनंतरच्या सत्रात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी श्री.चव्हाण यांचा व्यापारी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा व्यापारी महासंघांचे अध्यक्ष प्रसाद पारकर, मालवण व्यापारी संघांचे उमेश नेरुरकर, भाजपचे दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अशोक सावंत, नितीन वाळके विजय केनवडेकर आदी व इतर उपस्थित होते.
   यावेळी श्री.चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात व्यापार, उद्योगासाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधानांची भूमिका देशहिताची असून जुन्या कायद्यांमध्ये बदल, बँकिंग क्षेत्रात बदल, जनधन योजना, जिएसटी सारखी एक कर प्रणाली, मुद्रा कर्ज योजना, स्टार्टअप योजना या विविध उपक्रमामुळे व्यापार व उद्योग क्षेत्राला फायदा झाला आहे. कोरोना महामारी काळातही देशातील व्यापाऱ्यांच्या मेहनतीमुळे व पारदर्शी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली आहे, असेही ते म्हणाले. तसेच जिल्ह्यात काजू बी प्रमाणे बोन्डू ला देखील दर मिळावा, त्याच्या अर्कापासून नवीन उत्पादनांची निर्मिती करावी याकडे शासन लक्ष देत आहे. त्यासाठी प्रक्रिया केंद्रही शासन उभारणार आहे. यातून बागायतदारांना प्रति बोन्डू ५ ते ७ रुपये दर मिळू शकतो. व्यापाऱ्यांच्या विविध विषयांना मार्गस्थ करण्यासाठी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे, असेही श्री.चव्हाण म्हणाले.

विविध पुरस्कारांनी व्यापाऱ्यांचा गौरव

   या व्यापारी मेळाव्यात जिल्हा व्यापारी संघाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मानाचा समजला जाणारा ज्येष्ठ व्यापारी जीवनगौरव पुरस्कार मालवण मधील ज्येष्ठ व्यापारी आणि मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तर कै. माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार ज्येष्ठ हॉटेल उद्योजिका सुरेखा वाळके यांना, कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार खारेपाटण व्यापारी संघटना यांना, कै.बि.एस. तथा भाईसाहेब भोगले स्मृती ग्रामिण नव उद्यमी पुरस्कार नांदोस कट्टा येथील विघ्नेश मार्केटिंगचेमहेश यादव यांना, सेवाव्रती श्री. बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा उद्यमी पुरस्कार सावंतवाडी आंबोली येथील व्हिसलींग वूडस् चे हेमंत ओगले यांना, आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार देवगड व्यापारी संघांचे तालुकाध्यक्ष शैलेश कदम यांना व कै. उमेश विष्णू शिरसाट आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मालवणच्या सौ. रिया बांदेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यापाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.