सावंतवाडी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एका जुन्या गोदामाला आग

सावंतवाडी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एका जुन्या गोदामाला आग

 

सावंतवाडी

 

         सावंतवाडी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोरील एका जुन्या गोदामाला आज रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. 'द्वारकामाई' बिल्डिंगच्या समोरच ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आगीच्या ज्वाळा आणि गोदामातील वस्तूंच्या स्फोटांच्या आवाजांमुळे भरवस्तीतील नागरिक भयभीत झाले असून, पालिकेचा अग्निशमन बंब वेळेवर न पोहोचल्याने संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीच्या सुमारास या जुन्या गोदामातून अचानक धूर येऊ लागला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. गोदामात साठवून ठेवलेल्या काही वस्तूंनी पेट घेतल्यामुळे परिसरात मोठे आवाज (स्फोट) ऐकू येत आहेत. यामुळे आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवासी घाबरून घराबाहेर पडले असून घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे.आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ सावंतवाडी नगरपालिकेशी संपर्क साधला. मात्र, वारंवार फोन करून आणि माहिती देऊनही बराच वेळ पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला नव्हता. भरवस्तीत लागलेल्या या आगीमुळे मोठा अनर्थ घडण्याची भीती असतानाही प्रशासनाने दाखवलेल्या या उदासीनतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.