चार गडी राखून भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय.

चार गडी राखून भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय.

धरमशाला.

   भारताने २० वर्षाचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडवर चार गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला. मात्र, या दरम्यान विराट कोहलीचे शतक पाच धावांनी हुकले. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली आहे. वर्ल्ड कप २०२३ मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. या आवृत्तीचा हा २१वा सामना होता.धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.मात्र, त्याचे ४९ वे शतक हुकले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २७४ धावांची गरज होती.  न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा ) दुहेरी आकडा गाठू शकला.भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.