गुढी नववर्ष आणि नवचैतन्याची
थंडगार हवेची दुलई बाजूला सारत, सूर्यदेव हळूहळू आपली किरणे पसरवत, धुक्याच्या पडद्यामागून हळूच डोकावत आपली अस्तित्वाची जाणीव करून देतात आणि बराच काळ गारठून गेलेला निसर्ग पुन्हा नव्याने फुलायला उत्सुक होतो. निसर्गाला उबेचा हळुवार स्पर्श होतो आणि तो मोहरून निघतो. वसंत ऋतू दबक्या पावलाने हळूच येतो आणि कोमजून, निस्तेज झालेल्या निसर्गाला पुन्हा नवजीवन देतो. याच काळात झाडांना पालवी फुटते. निसर्ग आपल्यातच नवचैतन्याची रंगपंचमी खेळत असतो. म्हणून श्रीकृष्णदेखील आपली महती सांगताना म्हणतात, 'मासानां मार्गशीर्षो : हमृतूनां कुसुमाकर' म्हणजेच महिन्यांमध्ये पवित्र असा मार्गशीर्ष महिना मी आहे, तर ऋतूमध्ये फळा-फुलांनी बहरलेला, समृद्ध असा वसंत ऋतू मी आहे. असा हा वसंत ऋतू निसर्गाप्रमाणे मानवी जीवनातही सर्जनशीलता रुजवतो. अशा या वसंत ऋतूमध्ये सणांना सुरुवात होते.सुरुवात होते ती आपल्या दारी, अंगणी चैतन्याची, सकारात्मकतेची गुढी उभारून. चैत्र शुद्ध प्रतिपदा. नववर्षाचा पहिला दिवस. आपल्या भारतीय सणांचे वैशिष्ट्य हे आहे की, आपले हे सण निसर्ग आणि इतिहासाशी सांगड घालतात. इथला प्रत्येक सण हा निसर्गाशी आपल्या पौराणिक घटकांशी जोडलेला आहे. गुढीपाडवा या सणाशीदेखील आपल्या भावना अशाच जोडलेल्या आहेत.प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू पंचांगानुसार आपले नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होते. शालिवाहन शकाची सुरुवातदेखील याच दिवसापासून होते.याबाबत एक दंतकथा अशी की, शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण ओतले. त्यांच्या मदतीने त्याने शकांचा पराभव केला. त्यांनी मिळवलेल्या या विजयाचे प्रतीक म्हणून त्यांनी 'शक' या कालगणनेची सुरुवात केली. या कालगणनेची सुरुवात म्हणून ही गुढी उभारून आनंद साजरा केला जातो, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात केली, असे म्हटले जाते. रामायणामध्येही गुढीचा उल्लेख सापडतो. १४ वर्षांचा वनवास संपवून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले, तेव्हा लोकांनी घरोघरी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला. महाभारतात गुढीविषयीची आणखी एक कथा अशी सांगितली जाते की, चेदी राजा वसू जंगलात गेला आणि देवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांनी वसूला यशोदायी अशी वैजयंतीमाला आणि भ्रमंतीसाठी एक विमानदिले. तसेच राज्यकारभार सुरू करण्यासाठी राजदंडही दिला. या दैवी प्रसादाने वसू राजा आनंदून गेला. त्याने त्या राजदंडाच्या एका टोकाला जरीचे रेशमी वस्त्र ठेवून त्यावर सोन्याचा तांब्या बसवला आणि त्याची पूजा केली. पुराणातील या कथा बघता गुढी ही विजयाची, समृद्धतेची, सुखाची मानली जाते. संत साहित्यातदेखील या गुढीचा उल्लेख दिसून येतो. ज्ञानेश्वरीमध्येही गुढीचा उल्लेख आला आहे, अधर्माचि अवधी तोडीं। दोषांचीं लिहिलीं फाडीं। सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ऐके संन्यासी आणि योगी। ऐसी एक्यवाक्यतेची जगीं।
गुढी उभविली अनेगीं। शास्त्रांतरी ॥ बहिणाबाई चौधरीही आपल्या 'गुढी उभारनी' या कवितेतून गुढीपाडव्याचे सुंदर वर्णन करतात आणि लोकांना संदेशही देतात,
गुढीपाडव्याचा सण आतां उभारा रे गुढी नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी गेलसालीं गेली आढी आतां पाडवा.तुम्ही येरांयेरांवरी लोभ बाढवा वाढवा.
पाडव्याचा सण आला आहे. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, या नवीन वर्षी आपण नव्याने सुरुवात करू. आजपर्यंत मनात जी अढी निर्माण झाली असेल, काही गैरसमज झाले असतील, तर ते दूर करू आणि नवीन वर्षाचा नवीन संकल्प करू, असे बहिणाबाई सांगतात. खरं तर बहिणाबाईंचा हा संदेश आजच्या घडीला फार मोलाचा वाटतो. आज देशात, जगात जी अराजकता माजली आहे, विवेकबुद्धीने विचार न केल्यामुळे जी काही युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचे नकारात्मक परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहेत. आजची आपली जागतिक परिस्थिती लक्षात घेतली तर, अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. अनेक देशांमध्ये निर्माण झालेले युद्धजन्य तणाव, आर्थिक अस्थिरता यामुळे वाढणारी महागाई, प्रदूषण, अनारोग्य, बेकारी यासारखे अनेक प्रश्न जगाला भेडसावणार आहेत. या युद्धस्थितीमध्ये पुढे जाऊन आपल्यासारखीच सामान्य माणसे भरडली जाणार आहेत. जागतिकीकरणामुळे जग नक्कीच जवळ आले, पण त्यामुळे मतभेद वाढले, माणसा-माणसांमधील वाद वाढले, ईर्ष्या वाढली आणि याचेच परिणाम आज आपण अनुभवत आहोत.आज सामान्य माणसासमोर अनेक प्रश्न 'आ' वासून उभे आहेत. महागाई आकाशाला भिडत आहे. दूध, कडधान्य यासारख्या नियमित वापरात येणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत आहे, पाणीटंचाईसारखे प्रश्न तर दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारी शाळांमध्ये होणारी घट बघता सामान्य लोकांसाठी शिक्षणही स्वस्त राहिलेले नाही. दूषित हवा, पाणी, अन्न याचा आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे. एआय आणि तत्सम क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे बेकारी, त्यामुळे वाढत चाललेले गुन्हेगारीचे वाढते प्रमाण या सगळ्याचा विचार होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही वेगाने प्रगती होत आहे. त्याचा जितका आपण सदुपयोग करत आहोत, तितकाच दुरूपयोगही होत आहे. आपल्या वैयक्तिक माहितीचा कोण कसा वापर करेल, हे आज सांगता येत नाही. डिजिटल/सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी सामाजिक आणि मानसिक तणाव वाढताना दिसत आहेत. खोट्या बातम्या, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती याचा वैयक्तिक तसाच सामाजिक जीवनावर परिणाम होताना दिसतो आहे. हवामानात, निसर्गात होणाऱ्या बदलांचाही आपण विचार करणे गरजेचे आहे. आज भविष्याचा, परिणामांचा विचार न करता आपण जंगलतोड करत आहोत. अनियमित पाऊस, तापमानवाढ, इतर नैसर्गिक आपत्ती अनुभवाला येत असून जैवविविधतेचा हास होत आहे. पुढे जाऊन माणसालाच याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. निसर्गाच्या हानीचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला जाणवणार आहेत. नववर्षाच्या मुहूर्तावर आपण या सर्व मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे आहे.समाज बदलण्याआधी स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे. आपल्यापासून सुरुवात होईल तेव्हाच समाजात बदल दिसायला सुरुवात होईल. गुढीपाडव्याच्या कथा वाचताना आपल्या लक्षात येते की, हा सण विजयाचा व नव्या सुरुवातीचा दिवस आहे. दुष्टांचा पराभव करून, काळोखावर मात करून उभारली जाणारी गुढी ही विजयाची, नव्या आयुष्याची, आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गुढीपाडव्याचा सण केवळ परंपरा म्हणून मर्यादित नसून सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वपूर्ण आहे. या वर्षीही आपण गुढी उभारू. नवीन वर्षाचे स्वागत करू. वसंत ऋतू जसा थंडीने गारठून गेलेल्या, मरगळलेल्या सृष्टीला नवचैतन्य देतो, नवीन ऊर्जा देतो, तसेच आपणही आपल्या विचारांमधील जुनेपण टाकून देऊ व नवे वर्ष नव्या सकारात्मक ऊर्जेने सुरू करू. आपल्या समाजालाही नव्या विचारांची व नव्या सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे. ती सकारात्मक ऊर्जा, दृष्टिकोन आपण स्वतः अंगी बाळगायला सुरुवात करू तेव्हाच नवा बदल दिसून येईल व कदाचित तेच यंदा उभारल्या जाणाऱ्या गुढीचे वेगळेपण ठरेल.

konkansamwad 
