आदिशक्ती अभियानात' केळूस ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम
वेंगुर्ले
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सन २०२५-२६ पासून आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम शासन स्तरावरून जाहीर करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत महिला व बालकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर हे अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने वेंगुर्ले तालुकास्तरीय कमिटी गठीत करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत केलेल्या कामकाजाच्या आधारे प्राप्त झालेल्या ऑनलाईन प्रस्तावांपैकी गुणानुक्रमे ९ प्रस्तावांचे मूल्यमापन या समितीकडून करण्यात आले. यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना सर्वाधिक गुण मिळाले, अशा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यात केळूस ग्रामपंचायतीने प्रथम, पेंदूर ग्रामपंचायतीने द्वितीय, तर अणसूर ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी ग्रामपंचायतींचे पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

konkansamwad 
