आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणाकरीता राज्य शासनाकडून टास्क फोर्सची स्थापना. आ.वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती मागणी.
सिंधुदुर्ग.
आंबा पिकावर हवामानाबरोबरच इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते त्यावर उपाययोजना करण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व सर्वपक्षीय नेत्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.त्या मागणीचा विचार करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणाकरीता कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे.या टास्क फोर्स मध्ये कृषी विद्यापीठे व कृषी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.
कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे.अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला असून या टास्क फोर्सने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या प्रभावी नियंत्रणाकरीता संशोधन करुन उपाययोजना कराव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.