समुद्रातून ७०० कीलो जाळे काढून समुद्री जीवांना जीवनदान

समुद्रातून ७०० कीलो जाळे काढून समुद्री जीवांना जीवनदान


 

मालवण

 

    निवती लाईटहाऊस परिसरात पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेलेल्या राजेंद्र तारी यांच्या 'तारकर्ली डायव्हर्स' टीमला समुद्राच्या तळाशी तब्बल ६०० ते ७०० किलो वजनाचे घातक 'घोस्ट नेट' आढळून आले. हे जाळे समुद्री जीवांसाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक ठरणारे होते, मात्र या टीमने प्रसंगावधान राखत हे संपूर्ण जाळे बाहेर काढले आहे.या जाळ्यामध्ये अनेक जिवंत मासे अडकले होते, ज्यांची डायव्हर्सनी सुटका करून त्यांना पुन्हा समुद्रात मुक्त केले. हे अजस्त्र जाळे बाहेर काढण्यासाठी तापोळा सातारा येथून आलेले डाईव्ह मास्टर तेजस भोसले, आर्यन धनावडे, अमित पडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच खवणे कायाकचे रोहन परब, बोट चालक गजानन तोरसकर, नाना तोरसकर आणि स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले, सुमित पराडकर यांसह संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेऊन हे कचऱ्याचे जाळे किनाऱ्यावर आणले.या मोहिमेनंतर स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले यांनी समुद्राच्या स्वच्छतेबाबत महत्त्वाचा संदेश दिला. समुद्र आपल्याला ऑक्सिजनपासून अन्नापर्यंत सर्व काही देतो, त्यामुळे त्याला स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. निवती लाईटहाऊस परिसर सध्या पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत असून, अशा मोहिमांमुळे समुद्री पर्यटनाला आणि पर्यावरणाला मोठी मदत होत आहे. याआधीही या टीमने अनेकदा समुद्रातील कचरा आणि जाळी बाहेर काढून कासव व माशांना जीवदान दिले आहे. या धाडसी कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.