गोवा-महाराष्ट्र सीमेवर एका भरधाव कारची वाहनांना धडक

गोवा-महाराष्ट्र सीमेवर एका भरधाव कारची वाहनांना धडक

 

दोडामार्ग
 

   गोवा-महाराष्ट्र सीमेवर एका भरधाव कारने तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात  दोडामार्ग- गोवा सीमेवर घडला.
    अपघातग्रस्त कार दोडामार्गहून गोव्याच्या दिशेने जात होती. सीमेवर येताच या कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि ती विरुद्ध दिशेला गेली. विरुद्ध दिशेला जाताना कारने सर्वप्रथम गोव्यातून दोडामार्गमध्ये येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या एका दुचाकीला ठोकर मारली. दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर कार पुन्हा विरुद्ध दिशेला वळली आणि रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिसऱ्या एका कारला धडक दिली. दुचाकीला धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार दूर फेकला गेला व गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु पुढील उपचारासाठी त्याला गोवा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. कारचालक किरकोळ जखमी झाला मात्र या चालकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, इतर प्रवाशांच्या मदतीने कारमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात दोन्ही कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही दुचाकीही क्षतिग्रस्त झाल्या आहेत.