माघी गणेश जयंतीनिमित्त वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन.

दरवर्षीप्रमाणे श्री देव रामेश्वर मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव थाटात साजरा होणार आहे. ज्यानिमित्त रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यामार्फत काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे:
गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी उत्सवात प्रारंभ होणार असून श्री देव रामेश्वरावर लघुरुद्र व अभिषेक हे विधी पार पडतील. त्यानंतर शुक्रवार दिनांक 31/1/2025 रोजी श्री शनिदेव वर्धापनदिन उत्सव व सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच श्री नवचंडी देवता स्थापना व नवचंडी पाठवाचनास सुरुवात होईल. नंतर शनिवार दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी श्री देव नागेश्वर वर्धापनदिन उत्सव, श्री नागेश्वर लघुरुद्र,अभिषेक, श्री वरदशंकर व्रतपूजा हे कार्यक्रम पार पडतील. त्याचबरोबर गणेश जयंतीनिमित्त 21 गणपतींची स्थापना व 21 गणेशयाग पूर्णाहुतीसह सायंकाळी चार पासून हळदीकुंकू समारंभास प्रारंभ होईल. त्यानंतर रविवार दिनांक 02 फेब्रुवारी 2025 रोजी श्री देवी भगवती वर्धापनदिन उत्सव त्याचबरोबर श्री नवचंडी हवनयुक्त तसेच सकाळी दहा वाजल्यापासून कुंकूमार्चन व श्री नवचंडी हवनाची पूर्णाहूती समाप्त होईल. त्यानंतर सोमवार दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता श्री बारापाच देवतांस महानैवेद्य दाखवून त्यानंतर आरती, गाऱ्हाणे व सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. त्याचबरोबर उत्सवाच्या कालावधीत रोज रात्री 7 वाजता तरंगदेवतांसहित श्री गणेश, श्री भगवती, श्री नागनाथ, श्री दत्त महाराज या देवतांची भजनासहित पालखी प्रदक्षिणा होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन सर्व कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, वेंगुर्ला यांच्यामार्फत करण्यात आले आहे.