महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौका जप्त......देवगड किनाऱ्यावर मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई
देवगड
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने मध्यरात्री धडक कारवाई करत नौका जप्त केली आहे.हि कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारणा अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार करण्यात आली.
दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.४५ वाजता, देवगड समोर सुमारे १० वाव अंतरावर नियमित गस्तीदरम्यान अंमलबजावणी अधिकारी श्री. किरण वाघमारे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी परवाना असलेली “भारद्वाजा” (नोंदणी क्र. IND-KA-02-MM-4171) ही नौका श्री. अशोक गोपाल सालिन (रा. मल्लपी, उडुपी, कर्नाटक) यांच्या मालकीची असून, महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात ती अनधिकृत मासेमारी करताना पकडण्यात आली.
नौकेवरील तांडेल आणि खलाशी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, नौका देवगड बंदरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. नौकेवर आढळलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून, संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर केला जाणार आहे. सुनावणीअंती नौकेच्या मालकांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
ही कारवाई अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे, पोलिस कर्मचारी श्री. पाटील, तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक, देवगड यांच्या संयुक्त सहकार्याने आणि सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.

konkansamwad 
