मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे स्तुत्य उपक्रम......आजोबा आजी रमले नातवंडांच्या किलबिलाटात

वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूल येथे आजोबा-आजी दिवस आनंदमय वातावरणात साजरा झाला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना शाळेमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आजोबा-आजी प्रतिनिधी श्री. सुरेश अंकुश बोवलेकर व सौ. अमृता सुरेश बोवलेकर होते. तसेच पालक शिक्षक सदस्य किशोर पोतदार, येवझन आल्मेडा, सिस्टर अनिता, शिक्षक प्रतिनिधी विनायक ठाकूर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत नृत्याने झाली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर आजी आजोबांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग आठवणींना उजाळा माजी विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने तसेच सुंदर अशा नाटिकांनी दिला. आजी आजोबांचे स्थान मुलांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे कु. काव्या सामंत व कु. मयुष फर्नांडिस यांनी आपल्या भाषणातून सांगितले. शाळेतील सहाय्यक शिक्षिका ग्लॅनिस पिंटो यांनी आजी आजोबांबद्दल सुंदर विचार मांडले. यावेळी मुलांनी स्वतः आपल्या कलात्मकतेने बनवलेले शुभेच्छा पत्र सर्वांना वितरित केली. या सोहळ्याच्या निमित्ताने आजी सुप्रिया हळदणकर व श्रद्धा सामंत यांनी सुंदर आवाजात गाणी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. आजोबा यशवंत मठकर यांनी आजोबा आजी दिवस सोहळ्याविषयी ' खूप छान उपक्रम' अशी प्रतिक्रिया आपल्या विचारातून मांडली. सर्व आजी आजोबांचे प्रतिनिधित्व करणारे श्री. सुरेश बोवलेकर यांनी कार्यक्रम आयोजनाबद्दल सर्वांचे कौतुक करून या शाळेतून फक्त शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो याबद्दल शाळेला कौतुकाची थाप दिली व मदर तेरेसा शाळेविषयी सुंदर भावना व्यक्त केल्या. यानंतर मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी शाळेच्यावतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सात्विक पोतदार व कु.तबसुम दोस्ती यांनी केले. सर्वांचे आभार सहाय्यक शिक्षिका रिया पेडणेकर यांनी मानले.