युवकांनी स्वतःला व्यसनापासून दूर ठेवावे : राजेंद्र गाडेकर. कणकवली कॉलेज येथे अंमली पदार्थ सेवन विरोधी अभियान व ‘पोक्सो’ जनजागृती.

कणकवली.
युवकांनी मादक द्रव्य व पदार्थ यापासून स्वतःला अलिप्त ठेवावे, मादक पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम शरीरावरती व मनावरती सर्वकाळ राहतात. युवकांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता स्वतःला व्यसनापासून दूर ठेवावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी केले.
कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पोलीस स्टेशन कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित अमली पदार्थ सेवन विरोधी अभियान व पोक्सो जनजागृती कार्यक्रम अंतर्गत त्यांनी स्वयंसेवकाची संवाद साधला.याप्रसंगी व्यासपीठावरती राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेश पाटील व प्रा. सागर गावडे उपस्थित होते.
जानेवारी महिन्यामध्ये अमली पदार्थ सेवन विरोधी अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. कणकवली कॉलेज कणकवली एचपीसीएल सभागृहामध्ये अभियाना अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की कोणत्याही गैरसमजातून युवकांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. युवकांनी सजग राहावे व अमली पदार्थापासून स्वतःला दूर ठेवावे. या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी पोक्सो कायद्याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. अभियानाचे आयोजन प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी केले. प्रसंगी 150 स्वयंसेवक उपस्थित होते.