सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रप्रमुख समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन.

सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांच्या समस्या सोडविण्याकरीता सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रप्रमुख समन्वय समितीची स्थापना झालेली आहे.या समितीची सभा शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या सभेतील चर्चेनुसार 25 सप्टेंबर 2024 रोजीच्या राज्यस्तरीय शिक्षक संघटना आयोजित आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख सहभागी होत असल्याबाबत तसेच व्हाट्सअप ग्रुप मधून लेफ्ट होत असलेबाबत दिनांक २३ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी यांना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
यामध्ये विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख पदोन्नती तात्काळ करणे, केंद्रप्रमुख अतिरिक्त मेहनताना दोन वर्षापासून दिलेला नाही तो तात्काळ मिळावा, केंद्रप्रमुख सादील व समग्र शिक्षा अनुदान वेळीच मिळावे, वरिष्ठ निवड वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव वेळीच मंजूर करणे, केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी करणे, समूह साधन केंद्र इमारतीच्या देखभाल दुरुस्ती बाबत निधी उपलब्ध करून देणे, केंद्रप्रमुख पदोन्नतीची वेतन वाढ मिळणे बाबत अशा विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रप्रमुख समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हासरचिटणीस दिनकर तळवणेकर, जिल्हा कोषाध्यक्ष लहू दहिफळे, सहसचिव गोविंद चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख महादेव आव्हाड तसेच कार्यकारिणी सदस्य गुरुदास कुबल, कमलाकर ठाकूर, संजय पवार, शिवाजी गावित आदी उपस्थित होते.