शिक्षकाच्या मागणीसाठी तळेबाजार ग्रामस्थांचे देवगड गटविकास अधिकारी यांना निवेदन. जास्त पटसंख्या असल्याने नवीन शिक्षक भरतीमध्ये आपल्या शाळेला प्राधान्य देणार गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांची ग्वाही.

देवगड.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेबाजार या शाळेची पटसंख्या ८९ असून या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. व एक शिक्षक कामगिरीवर असे एकूण तीन शिक्षक आहेत. अपुऱ्या शिक्षक वर्गामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे आणखी एक शिक्षक मिळावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व तळेबाजार ग्रामस्थ यांनी देवगड गटविकास अधिकारी यांची भेट घेत शिक्षकाच्या मागणीसाठी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, तळेबाजार प्राथमिक शाळेत एकूण विद्यार्थी पटसंख्या एकूण ८९ आहे. सध्या दोन शिक्षक कार्यरत व एक कामगिरी शिक्षक असे एकूण तीन शिक्षक आहेत .विद्यार्थी लक्षात घेता अपुऱ्या शिक्षकाभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत तरी प्रत्येक इयत्तेसाठी एक शिक्षक मिळावा या मागणीचा विचार गांभीर्याने करून आमच्या रिक्त पदावर एक व कामगिरी शिक्षक एक मंजूर करून द्यावा अशी आशयाचे निवेदन तळेबाजार शाळा व्यवस्थापन समिती व तळेबाजार ग्रामस्थांनी देवगड पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांना दिले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत या शासनाच्या धोरणामुळे शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने प्रयत्न केला. त्यानुसार पटसंख्या देखील वाढली आहे.तळेबाजार मुख्य रस्त्यानजीकच ही शाळा आहे. त्यामुळे शिक्षक वर्गांची नेमणूक करण्यासाठी कोणतीही अडचण नाही असे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सागितले. येत्या ५,६,७ ऑगस्ट या कालावधीत नवीन होणाऱ्या भरतीमध्ये आपल्या शाळेला प्राधान्य दिले जाईल. मात्र ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल द्वारे होणार असल्याने समुपदेशन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना शाळा निवडण्याचा अधिकार आहे. आम्ही आमच्या स्तरावर जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षक देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी श्रीरंग काळे यांनी सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश लब्दे, उपाध्यक्षा सौ प्रियांका म्हापसेकर,तळवडे माजी सरपंच पंकज दुखंडे,समीर शिरवडकर, गणेश मांजरेकर ,रवींद्र चव्हाण ,सदानंद माणगावकर संदीप झाजन मानसी माणगावकर, प्रसाद पांगम आदी उपस्थित होते.