ऍप्रोचरोड नसल्यामुळे वाहतुकीस बंद असलेल्या आंबेरी पुलावरून आमदार वैभव नाईक आक्रमक. दोन दिवसात ऍप्रोच रोडचे काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा दिला इशारा.
कुडाळ.
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पुल मंजूर करून पूर्ण करून घेतले. मात्र सत्तांतर झाल्यानंतर पुलाच्या ऍप्रोचरोड साठी सत्ताधारी भाजपने निधी न दिल्याने जुन्या पुलावरून वाहतूक सुरु होती. मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीत जुन्या आंबेरी पुलाला भगदाड पडले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही न केल्याने तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आ.वैभव नाईक यांनी फैलावर घेतले.
आंबेरी पुलासाठी आ.वैभव नाईक यांनी बजेट अंतर्गत ६ कोटी २५ लाख रु मंजूर करून पुलाचे काम पूर्ण करून घेतले. मात्र त्यानंतर दोन वर्षात सत्तांतर होऊन सत्तेत आलेल्या भाजपने पुलाच्या ऍप्रोच रोडसाठी आवश्यक असलेला ५० लाखाचा निधी दिला नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली.त्यामुळे याचा फटका आज माणगाव खोऱ्यातील लोकांना बसला आहे.येणाऱ्या २ दिवसात ऍप्रोच रोडचे काम पूर्ण करून नवीन पुलावरून वाहतूक सुरु न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा आ. वैभव नाईक यांनी दिला.
यावेळी संजय पडते, अमरसेन सावंत,राजू कविटकर, अजित परब, अतुल बंगे, कौशल जोशी, सचिन काळप, उदय मांजरेकर, अमित राणे आदी उपस्थित होते.