विविध विकास योजनांसाठी १२ जुलै पर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.

विविध विकास योजनांसाठी १२ जुलै पर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

  क्रीडा व खेळाचा विकास, पारंपारीक खेळ व क्रीडा विषयक बाबींचे जतन, व्यायामशाळा व तालीम यांच्या माध्यमाद्वारे होत असून, युवांची शारीरिक सुदृढता वाढविणे हे व्यायामशाळा विकास योजनेचे मुळ उद्दीष्ट आहे. उद्योन्मुख खेळाडूंना क्रीडा कौशल्य व क्रीडा गुण विकसीत करण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य क्रीडांगणाच्या मुलभूत सुविधा तयार होणे आवश्यक असल्यामुळे क्रीडांगण विकास अनुदान योजना कार्यान्वित आहे. अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज प्रस्ताव दि. 12 जुलै 2024 रोजीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावा तसेच  अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अनुदानासाठी पात्र संस्था :

1.शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कँटोनमेंट बोर्ड) शासकीय रूग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

2.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शाळा व महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग मार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय उपजिल्हा रूग्णालय, शासकीय जिल्हा रूग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्षे पुर्ण झालेले आहेत असे शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र असतील.

3.क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय कार्यालये/जिमखाना हे अनुदानासाठी पात्र असतील.

 अनुदानाच्या बाबी :

  व्यायामशाळा विकास अनुदान योजना : व्यायामशाळा विकास योजनेमध्ये नवीन व्यायामशाळा बांधतांना किमान 500 चौ.फूट चटई क्षेत्राचे स्वतंत्र व्यायामगृह बांधकाम करणे याशिवाय बांधकामामध्ये कार्यालय / भांडारगृह, प्रसाधनगृह इ.बाबींचा समावेश असावा. व्यायामशाळा नुतनीकरण करणे व दुरूस्ती करणे . जुन्या नियमांनुसार बांधकाम पुर्ण झालेल्या व्यायामशाळा व किमान 500 चौ.फूट चटई  क्षेत्रफळाच्या नवीन व्यायामशाळांना अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा पुरवठा करणे.  खुली व्यायामशाळा उभारणे याकरीता अनुदान देण्यात येते. व्यायामशाळा विकास अनुदान प्राप्त करण्यासाठी लाभार्थीचे स्वत:च्या मालकीची अथवा दिर्घ मुदतीच्या ( किमान 30 वर्षे ) नोंदणीकृत भाडेपट्टा करारान्वये, बक्षिसपत्रान्वये, दानपत्रान्वये प्राप्त झालेली जागा असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त रू.7 लक्ष निधी मंजूर केला जातो.

  क्रीडांगण विकास अनुदान योजना : 

  क्रीडांगण विकास योजनेंतर्गत  क्रीडांगण समपातळीत करणे. २०० मीटर अथवा 400 मीटरचा धावनमार्ग तयार करणे.क्रीडांगणास भिंतीचे/तारेचे कुंपण घालणे.  विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे. प्रसाधनगृह/चेजींग रूम बांधणे.पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे.क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे.क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे. क्रीडा साहित्य खरेदी करणे. क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे. प्रेक्षक गॅलरीवर/आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे.  क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे. निर्मित सुविधा विचारात घेऊन मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी हँडा मिनी रोलर खरेदी करणे या बाबींकरीता जास्तीत जास्त रू.7 लक्ष व फक्त क्रीडा साहित्य खरेदी करीता जास्तीत जास्त रू.3 लक्ष निधी मंजूर केला जातो.

युवक कल्याण विषयक अनुदान योजना :

   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक योजनांतर्गत विविध योजना राबविल्या जाणाऱ्या युवक कल्याण योजनेंतर्गत समाज सेवा शिबीर राबविणे तसेच ग्रामीण व नागरी भागातील युवक मंडळांना आर्थिक सहाय्य केले जाते. बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार शिबीर व व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. समाजामधील युवकांची कार्यक्षमता उंचाविणे व त्यांची सामाजिक बांधिलकी वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ शैक्षणिक संस्था,युवक मंडळे, महिला मंडळे या नोंदणीकृत संस्था घेऊ शकतात व सदर मंडळ सामाजिक कार्य करीत असल्याबाबतचा अहवाल असावा.