आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सव २ मार्च रोजी.

आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सव २ मार्च रोजी.

मालवण.

  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील नवसाला पावणारी श्री देवी भराडी देवीची जत्रा २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. मंगळवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली.
  आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो.लाखो भाविकाना केंद्रबिंदु मानुन भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.
    प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर या सर्व अफवांना आता पुर्णविराम मिळाला आहे. राजकीय क्षेत्रातील  सर्व पक्षिय नेते जत्रेस उपस्थिती  दर्शवीत असल्याने ग्रामस्थ मंडळा बरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्या नंतर श्री देवी भराडी मंदिर आज २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.
   मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.
   मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खासगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र, नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.