आंबोली कावळेसाद दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

आंबोली कावळेसाद दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

सावंतवाडी
 

  आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी झाली. त्याचा मृतदेह दरीत दीडशे फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.कोल्हापूर येथून आंबोली येथे फिरण्यासाठी आलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमधील राजेंद्र हा तरुण काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कावळेसाद येथील दरीत कोसळला होता. दाट धुके असल्यामुळे त्याचा शोध घेण्यास अपयश आले होते. त्यामुळे काल सायंकाळी ही मोहीम थांबण्यात आली होती. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी एनडीआरएफचे पथक सांगेली व आंबोली रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोठ्या दोऱ्यांच्या सहाय्याने दरीत झुला सोडून राजेंद्र यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. १५० ते २०० फुटावर हा मृतदेह आढळून आला. डोक्याच्या बाजूने थेट दरीत कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी राजेंद्र याच्या नातेवाइकांसह मित्रपरिवार आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.