कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम

कणकवली

 

      शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर नगरपंचायत प्रशासन प्रत्यक्ष मैदानात उतरले. मुख्याधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील विविध भागांची पाहणी करत विक्रेत्यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. सर्वप्रथम मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या हद्दीबाहेर आलेले स्टॉल व साहित्य हटविण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नगरपंचायतीचे पथक मुंबई - गोवा महामार्गावरील उड्डाणपूलाखालील परिसरात पोहोचले. तेथील विक्रेत्यांनाही आपापले स्टॉल, दुकाने व अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी काही स्टॉलधारक आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेत संबंधितांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या.दरम्यान, अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला आमचा विरोध नसल्याचे सांगत भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदिवे यांनी विक्रेत्यांना पर्यायी व हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.सध्या नगरपंचायतीकडून विक्रेत्यांना सूचना व इशारे दिले जात असले तरी प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहीम कधी राबविली जाणार अशी चर्चा होत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन नेमक असे इशारे किती दिवस देणार? आणि प्रत्यक्षात कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.