दहावीत १०० % गुण मिळवणाऱ्या दिया सामंतचा नगरसेवक किशोर पाटकर यांच्याकडून गौरव

दहावीत १०० % गुण मिळवणाऱ्या दिया सामंतचा नगरसेवक किशोर पाटकर यांच्याकडून गौरव

कुडाळ


      दहावीच्या (एस.एस.सी.) परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या तालुक्यातील पाट हायस्कूलची विद्यार्थिनी दिया निलेश सामंत हिचा नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख (बेलापूर विधानसभा) किशोर अशोक पाटकर यांच्या हस्ते रोख एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या दिया हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन म्हणून श्री. पाटकर यांनी हे भरीव योगदान दिले.माध्यमिक शालांत परीक्षा २०२५-२६ मध्ये शंभर टक्के गुण मिळवून अभूतपूर्व यश संपादन करणाऱ्या दिया सामंतच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले व प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव केला.यावेळी प्रमुख पाहुणे नरेश परब (ग्रंथपाल, पणदूर हायस्कूल), अविनाश वालावलकर, हेबाळकर सर, दिया हिचे पालक निलेश सामंत व नेहा सामंत तसेच बहीण सानिया सामंत उपस्थित होते. संस्था व विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात नरेश परब, अविनाश वालावलकर, निलेश सामंत, संस्था कार्यवाह विजय ठाकूर तसेच जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगावकर यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.याप्रसंगी किशोर पाटकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचाही उल्लेख करण्यात आला. किशोर पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेतील मुलांना आतापर्यंत १५०० ते २००० सायकली वाटप केल्या आहेत. त्यांना शिक्षणाचे खूप महत्त्व वाटते. मुलांना शाळेत जाण्यास अडचण येऊ नये आणि त्यांचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी ते नेहमी मदत करतात. यापूर्वी त्यांनी प्रशाळेतील विद्यार्थ्यांना मोफत २०० सायकलींचे वाटप केले असून संस्थेच्या विविध उपक्रमांना त्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे.दिया सामंत हिला प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रात, "आपली ही अभिमानास्पद कामगिरी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रेरणादायी फलित आहे. आपले यश असंख्य विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल,” असा गौरवपूर्ण संदेश देण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, कार्यवाह विजय ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगावकर, मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक, गुणवत्ता वाढ प्रमुख विनायक कांबळे तसेच वर्गशिक्षिका सुमती मळेकर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी मानले.