बाधित शेतकऱ्याला सरसकट मदत मिळणार - पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यास प्राधान्य असून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मदत मिळेल, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हा ट्रिगर-१ मध्ये आला आहे. जनतेत भीती न पसरवता प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवावा. ट्रिगर-२ साठीचा अहवाल वस्तुनिष्ठ असावा.
महत्वाचे निर्देश
१० हजार कच्चे बंधारे बांधणार : भूजल पातळी वाढवण्यासाठी दरवर्षी ५ ते ६ हजार बंधारे बांधले जातात. यंदा १० हजार कच्चे बंधारे लोकसहभाग, विद्यार्थी आणि स्काऊट-गाईडच्या मदतीने बांधण्याचे निर्देश दिले.३४७ नादुरुस्त बंधारे दुरुस्त करा : जिल्ह्यात ८२० पक्के बंधारे सुस्थितीत असून ३४७ नादुरुस्त आहेत. ते तातडीने दुरुस्त करून वापरात आणा.तांत्रिक अडचणी नकोत :मदत देताना तांत्रिक अडचणी अडथळा ठरू नयेत. कृषी विभागाने बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करावेत.पाण्याचे नियोजन आधी केले असते तर आजची वेळ आली नसती. आता छतावरील पाणी संकलन आणि जलव्यवस्थापनावर भर द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पर्जन्यमान, पिके आणि जलसाठ्याचा आढावा मांडला. आमदार निलेश राणे यांनी भूजल अभ्यासासाठी तज्ज्ञ संस्था नेमण्याची सूचना केली, तर आमदार दीपक केसरकर यांनी ऑनलाइन सहभाग घेत जनजागृतीची मागणी केली.या बैठकीला जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
konkansamwad 
