विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी. सत्ताधारी-विरोधक येणार आमनेसामने; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार?.

मुंबई.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले होते. महायुती सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीतील नेते चार्ज झाले आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या अधिवेशनात पाहायला मिळेल. आदल्या दिवसांपासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विरोधक राज्यातील ड्रग्ज, महागाई, शेतकरी, आणि पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहे.
तर लोकसभेतील पराभवाने खचलो नसल्याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असेल. विरोधकांची एकी बघता सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होऊ शकतात. दरम्यान यंदा ३ आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. गुरुवारी २७ जूनपासून सुरू होणार्या अधिवेशनाचा समारोप १२ जुलैला होणार आहे. साधारण ३ आठवडे चालणारे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने दिलेले चहापानाचे निमंत्रण विरोधकांनी नाकारत सरकारविरोधात शड्डू ठोकला. चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला होता.
विरोधकांच्या बहिष्कारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सडेतोड उत्तर दिलं होतं. विरोधकांना चर्चा करायची नाही. ते चर्चेपासून पळ काढतात असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता. तर विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी महायुतीचं सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे, या सरकारने शेतकऱ्यांचे मारेकरी असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, फेब्रुवारीत जेव्हा राज्याचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. तेव्हा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला नव्हता. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात हा पाहणी अहवाल सादर करण्यात येईल. या अहवालाच्या निमित्ताने राज्य आर्थिक सामाजिक प्रगतीच्या आघाडीवर आहे की पिछाडीवर आहे, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.