विद्यमान ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी खुल्या निबंध लेखन स्पर्धा. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला चे आयोजन.

विद्यमान ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी खुल्या निबंध लेखन स्पर्धा.  वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला चे आयोजन.

वेंगुर्ला.

   स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्राम विकासाचा पाया म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते.विविध वित्त आयोगाच्या माध्यमातून भरघोस निधी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होत असून यातून शाश्वत ग्रामविकास व्हावा अशी रास्त अपेक्षा आहे.
    आज ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के आरक्षणामुळे महिलांना राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याची व ग्राम विकासात योगदान देण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे.काही महिलांनी या संधीचे सोनं केलेले दिसून येते, तर काही महिला अजूनही तेवढ्या गंभीरपणे या जबाबदारी कडे पाहताना दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
   बहुआयामी क्षेत्रांमध्ये अग्रणी असणाऱ्या महिला आज ग्रामपंचायत स्तरावरील सदस्य म्हणून काम करताना गावाच्या विकासात 'ती 'ची नेमकी भूमिका काय असेल?ती सक्षमपणे विचार मांडते का? की अजूनही तिचा आवाज दडपला जातो? तिच्या या विचारांना सांगोपांग व्यासपीठ देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्यावतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
    विद्यमान ग्रामपंचायत महिला सदस्यासाठी सदर स्पर्धा खुली आहे.निबंध लेखनासाठी 'गावाच्या विकासात महिलांची भूमिका : वास्तव आणि अपेक्षा' हा विषय असून किमान ७०० तर कमाल १००० शब्दांमध्ये महिलांनी आपले मत सबंधित विषयावर मराठी भाषेत व्यक्त करायचं असून सोबत ग्रामपंचायत सदस्य असल्याबाबत ग्रामविकास अधिकारी किंवा सरपंच यांचे शिफारस पत्र जोडणे अनिवार्य आहे.
   स्पर्धेची पारितोषिक पुढील प्रमाणे: प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये १००१, ७०१, ५०१, ३५१, ३५१ प्रत्येकी चित्रफ्रेम, प्रमाणपत्र आणि मेडल आणि सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर निबंध कागदाच्या एका बाजूला स्व:हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस; द्वारा प्रा.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, ता:वेंगुर्ला, जिल्हा: सिंधुदुर्ग, पिन-४१६५१५ या पत्त्यावर दिं.३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाठवायचे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.