सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लिपिक भरती परीक्षेची केंद्रनिश्चिती स्पष्ट.....अफवांवर बँकेचा अधिकृत खुलासा

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लिपिक भरती परीक्षेची केंद्रनिश्चिती स्पष्ट.....अफवांवर बँकेचा अधिकृत खुलासा

 

सिंधुदुर्ग

 

    सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या आस्थापनेवरील लिपिक श्रेणीतील ७३ रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या अधिकृत संस्थेमार्फत पार पडणार आहे.बँकेने स्पष्ट केले आहे की, आयबीपीएस ही रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्य करणारी आणि देशभरातील बँकांच्या भरती प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने राबविणारी विश्वासार्ह संस्था आहे. त्यामुळेच भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएसची निवड करण्यात आली.लिपिक पदासाठी जिल्हाभरातून तब्बल ५,०७७ अर्ज प्राप्त झाले. प्रारंभी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा येथे परीक्षा केंद्रे प्रस्तावित होती. मात्र संबंधित ठिकाणांच्या तांत्रिक व पायाभूत सुविधांची तपासणी केल्यानंतर सर्व उमेदवारांची परीक्षा एकाच सत्रात घेणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले.प्रश्नपत्रिकेतील काठिण्य समान राखण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक असल्याने आयबीपीएसने मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे अतिरिक्त केंद्रांची निश्चिती केली आहे. या बदलामुळे काही उमेदवारांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने बँकेने अधिकृत खुलासा प्रसिद्ध केला आहे.ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी सुरक्षित व एन्क्रिप्टेड सॉफ्टवेअर, सर्व्हर लोड मॅनेजमेंट, स्वतंत्र संगणक व्यवस्था (किमान ४ जीबी रॅम, आवश्यक प्रोसेसर स्पीड, १५ इंच मॉनिटर), यूपीएस व जनरेटर बॅकअप, हाय-स्पीड इंटरनेट व बॅकअप लाईन, फायरवॉल सुरक्षा, बायोमेट्रिक कॅप्चर आणि ऑन-साईट आयटी सपोर्ट या सुविधा आवश्यक असतात. जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध नसल्याने केंद्रनिश्चितीत बदल करावा लागल्याचे बँकेने नमूद केले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, म्हापसा, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आणि पुणे या ठिकाणी विविध मान्यताप्राप्त संस्थांमध्ये परीक्षा होणार असून, उमेदवारांना प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या केंद्रावरच उपस्थित राहणे बंधनकारक आहे.भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित पद्धतीने पार पडावी हा बँकेचा उद्देश असून, उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे व नियोजित केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.