माझी मराठी, माझा अभिमान: उत्सवाकडून अस्तित्वाकडे!

माझी मराठी, माझा अभिमान: उत्सवाकडून अस्तित्वाकडे!

 

       ज्ञानेश्वरांच्या शब्दांतून अमृताशी पैजा जिंकरणारी, तुकारामांच्या गाथेतून साध्या माणसाला देवपण देणारी आणि कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'तून तारुण्याला नवा उजेड दाखवणारी आपली मराठी! २७ फेब्रुवारी हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या अस्तित्वाचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या मायबोलीचा 'महोत्सव' आहे. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही; ती महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि शौर्याची ओळख आहे. ज्ञानेश्वरांच्या 'पसायदानातून' प्रकटलेली ही भक्ती, तुकारामांच्या 'अभंगांतून' झळझळलेली ही क्रांती आणि शिवरायांच्या 'राजव्यवहार कोशातून' सिद्ध झालेली ही अस्मिता आहे. ही भाषा नाजूक 'लावणी'त नखरेल वाटते, तर पोवाड्यामध्ये तीच तलवार होऊन तळपते. आपण मराठीचा अभिमान बाळगतो, पण जेव्हा व्यवहाराची वेळ येते, तेव्हा आपली पावले इंग्रजीकडे वळतात. 'कॉन्व्हेंट' संस्कृतीच्या अट्टाहासापोटी आपण आपल्या मुलांना मातृभाषेपासून दूर नेत आहोत का? इंग्रजी शिकणे ही काळाची गरज आहे, यात शंका नाही; पण इंग्रजीच्या नादात मराठी 'मराठी' राहते का, हा विचार करणे गरजेचे आहे. जेव्हा एखादा मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी हिंदी किंवा इंग्रजीतून संवाद साधतो, तेव्हा आपण मराठीला नक्कीच न्याय देत नसतो. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवांच्या अभंगांपासून ते पु.ल. देशपांडे, वपु काळे यांच्या साहित्यापर्यंत मराठीचा वारसा श्रीमंत आहे. पण आजची तरुण पिढी या साहित्यापासून तुटताना दिसत आहे. वाचनालयांतील गर्दी कमी होत चालली आहे आणि ई-पुस्तकांच्या जमान्यातही मराठी साहित्याला 'क्लिक्स' मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आपण वर्षातून एकदा ग्रंथदिंडी काढतो, पण वर्षभर हातात पुस्तक धरतो का? आपण जेव्हा खऱ्या अर्थाने मराठीत विचार करू, मराठीत स्वप्ने पाहू आणि मराठीला आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग मानू, तेव्हाच आपण मराठीला खरा न्याय दिला असे म्हणता येईल. शेवटी, मराठीला न्याय देणे म्हणजे केवळ तिची स्तुती करणे नव्हे, तर तिला आपल्या श्वासात आणि विश्वासात स्थान देणे होय. ती केवळ पुस्तकात किंवा भाषणात बंदिस्त राहू नये, तर ती आपल्या घरातील संवादात रेंगाळली पाहिजे आणि आधुनिक जगाच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने उभी राहिली पाहिजे. ज्या दिवशी एखाद्या मराठी तरुणाला मराठी बोलताना न्यूनगंड वाटणार नाही आणि ज्या दिवशी आपल्या घरातील लहान मुले 'ए फॉर ॲपल' सोबतच 'अ' अक्षराची ओळख अभिमानाने करून देतील, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने कुसुमाग्रजांचे स्वप्न साकार होईल.