स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ले नगरपरिषद कोकण विभागात अव्वल

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ले नगरपरिषद कोकण विभागात अव्वल

 

वेंगुर्ला

 

       वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये २० हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरी नुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक व राज्यामध्ये ३ रा क्रमांक तसेच देशात १५ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रामधील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात १४ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. वेंगुर्ला शहरास "जीएफसी 1 स्टार व ODF ++" मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत प्रत्येक घरोघरी १०० टक्के विलगीकृत कचऱ्याचे संकलन केले जाते. या विलगीकृत कचऱ्याचे नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथे विविध २७ प्रकारात वर्गीकरण केले जाते. संकलित करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती तसेच जैविक खत निर्मिती केली जाते. सुक्या कचऱ्याचे उपयोगानुसार विविध प्रकारात वर्गीकरण करून त्याची विक्री केली जाते. शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. शहरातील सार्वजनिक शौचालयांचे नियमितपणे देखभाल दुरुस्ती करून स्वच्छता राखण्यात येते. शहरातील गटारे, व्हाळी यांची नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. शहरांमध्ये सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले जाते.स्वच्छ सर्वेक्षण कालावधीमध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत खालीलप्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात आले.वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत "प्लॅस्टिक निर्मूलन पथक" स्थापन करण्यात आले व त्यांच्या मार्फत नियमितपणे सिंगलयुज प्लॅस्टिक वापरणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच शहरामध्ये प्लॅस्टिक बंदीबाबत माहिती फलक, भिंतीचित्रे, पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नियमीतपणे शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या तसेच शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वच्छता विषयक विविध प्रकारच्या स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शहारातील विविध पदाधिकारी व नागरिक यांच्या सहाय्याने अनेक ठिकाणी साफसफाई करण्यात आली. तसेच नगरपरिषदेमार्फत दर महिन्याला मांडवी येथे कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लावासियांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे वेंगुर्ला नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे, असे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले.