कुडाळ पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
कुडाळ
तालुका पत्रकार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला.या कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर यांना व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हा पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जतीन भिसे यांना व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती छायाचित्रकार पुरस्कार आणि भरत केसरकर यांना पत्रकार वसंत दळवी स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि थोर व्यक्तींच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी यावेळी पत्रकारांना विकासात्मक पत्रकारिता करण्याचे आवाहन केले आणि आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला.
पुरस्कारप्राप्त पत्रकारांशिवाय गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या अजय सावंत, वैशाली खानोलकर, निलेश जोशी, प्रमोद ठाकूर आणि त्यांच्या पाल्यांचा समावेश होता. सत्कारमूर्ती संतोष वायंगणकर यांनी आपल्या मनोगतात आजच्या पत्रकारितेवर परखड भाष्य केले, तर भरत केसरकर यांनी ग्रामीण पत्रकारितेतील आपले अनुभव मांडले. कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर यांनी प्रास्ताविक केले, निलेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले आणि अजय सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

konkansamwad 
