रात्रीच्या आसऱ्याला फूटपाथ.....नजरेत विजयपथ परजिल्हयातील उमेदवारांचे 'मिशन पोलीस भरती

रात्रीच्या आसऱ्याला फूटपाथ.....नजरेत विजयपथ परजिल्हयातील उमेदवारांचे 'मिशन पोलीस भरती

 

सिंधुदुर्ग

 

         दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांची संख्या वाढतच चालली आहे. कुठलीही नोकर भरती असली की, हजारोंच्या संख्येने उमेदवारांचे अर्ज आणि उपस्थिती दिसून येते. सिंधुदुर्ग पोलीस दलात सुरू असलेल्या भरतीतही याचाच प्रत्यय येत आहे. या भरतीसाठी बेरोजगार तरुण प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. लातूर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी सिंधुदुर्गनगरीत दाखल झालेले बेरोजगार तरुण अक्षरशः फुटपाथवर व अन्य ठिकाणी आसऱ्यास असल्याचे दिसत आहेत. नोकरीसाठी त्यांची काहीही करायची तयारी असून वाढती बेरोजगारीही यातून अधोरेखित होत आहे.महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, या सर्वांनाच नोकरी मिळत नाही. कोरोना काळात अनेक तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. त्यानंतरही त्यांना नोकऱ्या न मिळल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढतच गेले. आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत गेल्याने अनेक कंपन्यांकडून मोठी नोकर कपातही झाली. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढून कुठलीही नोकरभरती असली की तेथे हजारो बेरोजगार रांगा लावून उभे राहतात. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ल्यात पोलीस भरती सुरू असून त्यासाठी हजारो तरुण रांगत आहेत.पोलीस भरती असो किंवा वेगवेगळ्या विभागातील नोकर भरती, तेथे भरतीसाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. लेखी परीक्षेबरोबरच मैदानी चाचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर शारीरिक चाचणीला जाण्यासाठी तयारी करावी लागते. आज पोलीस भरतीत उभे राहिलेले अनेक तरुण किंवा तरुणी या सर्व चाचण्यांना सामोरे जातीलच. परंतु या तरुणांमध्ये केवळ पदवीधर तरुणच नाहीत, तर उच्च पदवी घेतलेल्या अनेक तरुण तरुणी भरतीसाठी उतरल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पोलीस भरतीबाबत सांगायचे झाले तर जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या शिपाईपदाच्या ७८ आणि पोलीस चालक पदाच्या नऊ अशा एकूण ८७ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर सुरू आहे. ८७ पदांसाठी ७ हजार २९८ उमेदवारांचे अर्ज आले असून रोज ८०० ते १००० उमेदवारांना मैदानी व शारीरिक चाचणीसाठी बोलावले जात आहे. ही भरती प्रक्रिया २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यात शारीरिक व मैदानी चाचणीसाठी रोज पहाटे ५ वाजता मैदानावर बोलावले जाते. त्यामुळे उमेदवारांना आदल्या दिवशीच येऊन राहावे लागते. किंवा पहाटे ४ वाजता हजर राहावे लागते. सिंधुदुर्गातील उमेदवार पहाटे ५ वाजता येऊ शकतात. परंतु जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना आदल्या दिवशी येऊन थांबल्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे सध्या सिंधुदुर्गनगरीत जिल्ह्याबाहेरून आलेले उमेदवार ठाण मांडून बसल्याचे दिसत आहे.एकूण ८७ पदांसाठी आलेल्या सुमारे ७ हजार अर्जामधून सिंधुदुर्गातील उमेदवार किती आहेत, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस भरतीत जिल्ह्याबाहेरून आलेल्या उमेदवारांची संख्या मात्र मोठी असल्याचे चित्र आहे. बुधवारी रात्री ११ वाजता सिंधुदुर्गनगरीत फेरफटका मारला असता, परजिल्ह्यातून आलेले उमेदवार ठिकठिकाणी अक्षरशः उघड्यावरच झोपलेले दिसून आले. यातून नोकर भरतीसाठी मेहनत घेऊन काहीही करण्याची किंवा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी त्यांच्यात दिसून येते. या उमेदवारांशी बातचित केली असता, ते बुलढाणा, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली आदी जिल्हयातील असल्याचे समजले. बहुतांश उमेदवार हे वेगवेगळ्या पदव्या प्राप्त असलेले उच्च शिक्षितही आहेत. सरपटणारे प्राणी किंवा जंगली प्राण्यांची भीती न बाळगता अक्षरशः फूटपाथवर तसेच क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टच्या मैदानावर, डॉन बॉस्को स्कूलसमोरील गवळदेव येथील झाडाखाली आणि सिंधुदुर्गनगरी बसस्टँडवर झोपत आहेत. उघड्यावर रात्र काढून दुसऱ्या दिवशी ते पोलीस भरतीला सामोरे गेले. त्यामुळे बेरोजगारीचे वास्तव दिसत आहे.अलिकडील पोलीस किंवा अन्य नोकर भरतीमध्ये सिंधुदुर्गातील तरुणांचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात दिसत आहे. परंतु अजूनही म्हणावी तशी मेहनत घेतली जाताना दिसत नाही. कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याची तयारी सिंधुदुर्गातील तरुणांमध्ये दिसत नाही. परजिल्ह्यातील तरुण नोकर भरतीसाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना दिसतात. जिल्ह्यातील तरुणांनीही नोकरभरतीला सामोरे जाण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अन्य कुठल्याही जिल्ह्यात जाण्याची तयारी ठेवायला हवी. तरच आगामी काळात नोकरभरतीत सिंधुदुर्गातील तरुणांना संधी मिळू शकते. अन्यथा परजिल्ह्यातील उमेदवारांचाच भरणा होऊ शकतो. नंतर स्थानिकांवर अन्याय झाला, अशी ओरड करून काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा परजिल्हयातील उमेदवार किती मेहनत घेतात, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवतात, याचाही जिल्ह्यातील तरुणांनी विचार करण्याची गरज आहे. सिंधुदुर्गसह अन्य जिल्ह्यातही नोकर भरती असते, त्यावेळी परजिल्ह्यात जाण्याची मानसिक तयारी करण्याची गरज आहे. तरच सिंधुदुर्गातील तरुण-तरुणींना वेगवेगळ्या नोकर भरतीत संधी मिळू शकते. अन्यथा बेरोजगारीचे प्रमाण हे वाढतच जाऊ शकते.