चेतन देवरुखकर कुटुंबीयांकडून साकेडी शाळेला लाऊड स्पीकर सेट भेट.

चेतन देवरुखकर कुटुंबीयांकडून साकेडी शाळेला लाऊड स्पीकर सेट भेट.

कणकवली : 

   आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे ऋण फेडण्याकरिता तसेच विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करण्याकरिता शिक्षकांनी दिलेल्या हाकेला हात पुढे करत जर्मनी येथे आयटी इंजिनियर पदावर असलेल्या चेतन देवरुखकर यांनी साकेडी सरस्वती विद्यामंदिर शाळा नंबर 1 ला लाऊड स्पीकर सेट भेट दिला. शाळेमध्ये होणारे विविध कार्यक्रम, उपक्रम याकरिता सातत्याने लाऊड स्पीकरची गरज भासते. ही बाब मुख्याध्यापिका समिधा वारंग यांनी चेतन देवरुखकर कुटुंबीयांच्या निदर्शनास आणली. त्यावर माजी पंचायत समिती सदस्य अनघा देवरुखकर व जिल्हा परिषद मधील अधिकारी सुनील देवरुखकर यांनी ही बाब तात्काळ मान्य केली. शाळेच्या वतीने या लाऊड स्पीकर सेट प्रदान प्रसंगी देवरुखकर कुटुंबांचा सत्कार देखील करण्यात आला. साकेडी शाळा नंबर 1 या ठिकाणी झालेल्या या लाऊड स्पीकर सेट प्रदान कार्यक्रम प्रसंगी सरपंच सुरेश साटम,  शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष अक्षता राणे, ग्रा.प व शाळा व्यवस्थापन सदस्य  दिगंबर वालावलकर, उपसरपंच प्रज्वल वर्दम, ग्रा प सदस्य  सुविधा गुरव, विशाखा राणे, प्रतीक्षा जाधव, माजी सभापती संजय शिरसाट, माजी प स सदस्य अनघा देवरूखकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू सदडेकर, माजी सरपंच रिना राणे, माजी तंटामुक्त अध्यक्ष मुरारी राणे, आयटी इंजिनिअर चेतन देवरुखकर, निकिता देवरुखकर, सुनील देवरुखकर, कियारा देवरुखकर, सोनिया नारिंगरेकर, शिक्षक प्रभाकर पावसकर, दीक्षा सावंत सावंत, उमेश मोरे, ग्रा प कर्मचारी रोहित राणे, आदी उपस्थित होते.
   यावेळी लाऊड स्पीकर मशीन, दोन स्पीकर बॉक्स, दोन माईक, माईक स्टॅन्ड, पेन ड्राईव्ह व त्या अनुषंगाने सर्व साहित्य सेट स्वरूपात शाळेजवळ प्रदान करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने चेतन देवरुखकर व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच सुरेश साटम म्हणाले, ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेला न विसरता चेतन देवरुखकर यांनी आज जे साहित्य प्रदान केले अशी आपल्या शाळेची आठवण सर्वांनीच ठेवली पाहिजे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन इतराने देखील असेच पुढे येणे गरजेचे आहे. माजी सरपंच रीना राणे यांनी लाऊड स्पीकर साहित्य भेट दिल्या बद्दल देवरुखकर कुटुंबीयांचे कौतुक केले. तसेच मी सरपंच असताना आराखड्यात या बाबींचा समावेश केला होता. मात्र माझ्याकडून अखेरच्या काळात ही बाब अपूर्ण राहिली. ती चेतन देवरुखकर व कुटुंबीयांनी पूर्ण केली त्याबद्दल समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व साहित्य शाळेला प्रदान करणारे चेतन देवरुखकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय डोळ्यासमोर बाळगा. ज्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर घडवा. मी जर्मनी पर्यंत पोहोचण्यामागे माझ्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे असे त्यांनी सांगितले. माजी पंचायत समिती सदस्य अनघा देवरुखकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना आजच्या या कार्यक्रमासाठी गावातून जी उपस्थिती पाहिली त्याने समाधान वाटले. चांगल्या उपक्रमाला गावामध्ये नेहमीच पाठिंबा दिला जातो ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. चेतन हा जर्मनी येथे पोहोचण्यासाठी त्यांने घेतलेली मेहनत कष्ट व नम्रता अशा गोष्टी विद्यार्थ्यांनी आत्मसात करून तसे वागले पाहिजे. जेणेकरून भविष्यात प्रत्येक जण मोठ मोठ्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकेल.शाळा व्यवस्थापन व ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी देवरुखकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी नेहमीच पुढे राहिले आहे.अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात न राहता आपापल्या परीने सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो. चेतन देवरुखकर हे जरी परदेशात गेले तरी त्यांनी आपण शिक्षण घेतलेली गावातील शाळा विसरले नाही. ही बाब महत्त्वाची आहे असे उद्गार काढले. तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समिधा वारंग यांनी जिल्ह्यात आदर्श शाळा म्हणून साकेडी शाळेचे नाव आलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन झटूया. गावातील सर्वांनीच शाळेच्या वाटचालीसाठी झटले पाहिजे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पावसकर यांनी तर आभार उमेश मोरे यांनी मांनले.