भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी महावितरणला ५७२ कोटी मंजूर.

भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी महावितरणला ५७२ कोटी मंजूर.

रत्नागिरी.

   केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून महावितरण कंपनीला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर झाला आहे. या योजनेतून मंडणगड, दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्येही किनारी भागातील विद्युत ग्राहकांना विनाखंडित सेवा मिळावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमातून हे काम सुरू झाले आहे.
   महावितरण कंपनीने या बाबतचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजूरी मिळाली आहे. सुमारे ५७२ कोटीच्या या प्रकल्पातून किनारपट्टी भागात २ किमी अंतरापर्यंतच्या वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. यामध्ये लघुदाब २२०० किमी, तर उच्चदाब ५५० किमी विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. यापूर्वी झालेल्या तोक्ते, निसर्ग चक्रीवादळाने किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वित्त व जीवीत हानी झाली. यात कोट्यवधींचे नुकसान झाले. भविष्यात कोकण किनारपट्टीवर अशा प्रकारचे चक्री वादळे धडकण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून भूमिगत विद्युत वाहिन्यांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
   या प्रकल्पामध्ये केंद्र शासनाच्या ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के वाटा राहणार आहे. दापोली किनारपट्टीवर लघुदाब ३५० किमी भूमिगत वाहिन्यांसाठी ३६ कोटी, तर उच्चदाब १३० किमीसाठी ४८ कोटी मंजूर आहेत. मंडणगडसाठी लघुदाब ६५ किमीसाठी ७ कोटी, तर उच्चदाब २० किमीसाठी ७ कोटी, रत्नागिरीसाठी लघुदाब ४९१ किमीसाठी ४६ कोटी, तर उच्चदाब ३१० किमी ५७ कोटी मंजूर आहेत. राजापूरसाठी लघुदाब २६३ किमीसाठी २८ कोटी, तर उच्चदाब ९६ किमी २२ कोटी, गुहागरसाठी लघुदाब ४८० किमीसाठी ४९ कोटी, तर उच्चदाब २६० किमी ११४ कोटी मंजूर आहेत. दापोली तालुक्यात किनारपट्टीभागात लघुदाब ३५० किमीला ३६ कोटी, तर उच्चदाब १३० किमीसाठी ४८ कोटी मंजूर आहेत. या प्रकल्पासाठी एजन्सी नेमली असून काम सुरू झाले आहे.