मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस १७' चा विजेता.
मुंबई.
कलर्स टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस १७' चा महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. या सीझनमध्ये स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी बहूमतांनी 'बिग बॉस १७' चा विजेता ठरला आहे. त्याला ट्रॉफीसोबतच ५० लाख रुपये रोखरक्कम आणि एक आलिशान ह्युनडाई क्रेटा कार भेट देण्यात आली, पण त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्याला फक्त ८५० रुपयांसाठी तासनतास काम करावे लागले होते. आज आपल्या मेहनतीने मुनव्वर दिवसाला ३ ते ४ लाख रुपये कमावतो.मुनव्वर फारुकीने 'बिग बॉस १७' मध्ये अनेकदा त्याच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख केला होता. प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी त्याने खूप संघर्ष केला आहे, आपल्या आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. इथपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. एक काळ असाही होता जेव्हा तो ११ तास काम करून महिन्याला ८५० रुपये कमावायचा. एका मुलाखतीत मुनव्वरने सांगितलेले की- "मी एका गिफ्ट शॉपमध्ये दोन महिने काम केले. तिथे सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत काम करायचो. दररोज ११ तास काम केल्यानंतर मला महिन्याला ८५० रुपये मिळायचे. कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी मला ३.५ किमी चालत जावं लागयचं. सततच्या संघर्षाला वैतागुन त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला पण नंतर मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि घराबाहेर समोस्याचा स्टॉल लावायला सुरुवात केली.मुनव्वर हा स्टँड अप कॉमेडियन आहे. तो यूट्यूबवर खूप लोकप्रिय आहे. 'बिग बॉस १७'पूर्वी तो कंगना रणौतच्या 'लॉक अप' शोमध्ये दिसला होता. या शोची ट्रॉफीही त्याने जिंकली होती. 'बिग बॉस १७' प्रमाणेच मुनव्वरने 'लॉक अप' दरम्यानही त्याच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी सांगितलेल्या. तेव्हा त्याने आपल्या आईने ३५०० रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. तेव्हा ते कर्ज फेडू न शकल्याची खंत त्याला आजतागायत आहे.मुनव्वर फारुकी हा शोमधील त्याच्या गेममुळे चर्चेत होता. पण सोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो खूप चर्चेत आला होता. त्याच्यावर डबल डेटिंगचे आरोप लावण्यात आलेले त्यानंतर मुनव्वरचा खेळ बिघडला, परंतु शोच्या शेवटच्या दिवसांत मुनव्वरने पुन्हा आपल्या खेळात सुधारणा करून सर्व स्पर्धकांना तगडी टक्कर दिली आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकून सर्वांनाच चकित केले. ही ट्रॉफी जिंकण्यासोबतच मुनव्वरला ५० लाख रुपये आणि एक आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे.