ओटवणेत दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी
ओटवणे येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ओटवणे येथे काढण्यात आलेल्या दुर्गा माता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ओटवणे कुळघर ते रवळनाथ मंदिरपर्यंत काढण्यात आलेल्या या दुर्गामाता दौडमध्ये महिलांसह युवती व युवक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.ओटवणे कुळघर येथे या दुर्गामाता दौडचा शुभारंभ ओटवणे सरपंच आत्माराम गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ठीकठिकाणी या दुर्गामाता दौडमधील ध्वजाचे महिलांनी पूजन केले. या दौडदरम्यान राष्ट्र व देश भक्तीगीते गाऊन तसेच दुर्गामाता व शिवाजी महाराजांचा अखंड जयजयकार सुरूच होता. त्यानंतर रवळनाथ मंदिराकडे ही दुर्गामाता दौड पोहोचल्यानंतर मंदिराचा परिसर शिवमय झाला. तसेच यावेळी देशभक्तीपर समूहगीते म्हणण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्रीरंग सावंत यांनी दुर्गामाता दौडचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर रवळनाथ मंदिराला एक प्रदक्षिणा घातल्यानंतर दुर्गामाता दौड ओटवणे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातील दुर्गामातेकडे आली. त्यानंतर महाआरतीने या दुर्गामाता दौडची सांगता झाली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिनेश सावंत यांनी जिजाऊंनी प्रतिवर्ष देवीची उपासना केली, भवानी मातेजवळ स्वतःच्या संसारासाठी नव्हे वा भोसले वंशासाठी नव्हे तर कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पसरलेल्या भारतमातेचा उध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागितले. जिजाऊंच्या ह्या संस्कारांशी जोडण्याचा उपक्रम म्हणजेच श्री दुर्गामाता दौड असल्याचे सांगितले. तसेच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी जिजाऊ मा साहेबांनी देवीकडे मागण मागितल होत. त्या मागणीची परतफेड म्हणून संपूर्ण भारतभर दुर्गामाता दौड नवरात्रोत्सवामध्ये साजरी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.या दुर्गामाता दौडचे नियोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व कार्यकर्ते तसेच ओटवणे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे प्रभाकर गावकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी राया शहाजी लांबर, भक्ती पनासे, पूजा पुनाजी पनासे, शर्मिला शामसुंदर देवळी, स्नेहा भाईप, जागृती बिले, रसिका मेस्त्री तसेच श्री देव रवळनाथ वाचनालय, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ ओटवणे, ओटवणे ग्रामस्थ आदींनी केले होते.