सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या श्रध्दाराजे भोंसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत राजे खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लखम सावंत भोंसले उपस्थित होते. ऑनलाईन प्रक्रियेमुळे नगराध्यक्षपदासाठी श्रद्धा सावंत भोंसले यांनी आज हा अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण हळूहळू तापत असतानाच आज कोणतीही कल्पना न देता भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झालेल्या सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराणी सावंत भोंसले यांनी कोणताही गाजावाजा न करता कुटुंबासमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज लक्षात घेता सावंतवाडी राजघराण्यातील नगरपालिकेच्या किंबहुना शहरातील राजकारणामध्ये ही पहिलीच एंट्री ठरली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, युती संदर्भात काहीच निर्णय झाला नसताना शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. त्यात शिवसेनेकडून उद्या शनिवारी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. तर भाजपकडून सुद्धा उद्या किंवा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तर आत्तापर्यंत नगरसेवक पदासाठी दहा जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून आठ जणांनी तर अपक्ष दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

konkansamwad 
