एसआरएम कॉलेजमध्ये ३० सप्टेंबरपासून कोकण विभागीय बॅडमिंटन स्पर्धा

एसआरएम कॉलेजमध्ये ३० सप्टेंबरपासून कोकण विभागीय बॅडमिंटन स्पर्धा

 

कुडाळ

 

        कोकण विभागातील युवक क्रीडापटूंना संधी आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय (विभाग ४) आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद संत राऊळ महाराज महाविद्यालयाला मिळाले आहे. ही स्पर्धा ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टवर रंगणार आहे.यात कोकणातील एकूण ३३ महाविद्यालयांचा समावेश असून १६६ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोकण विभाग क्रीडा समिती सचिव (मुबई विद्यापीठ ) चंद्रकांत नाईक व येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ए.एन.लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक प्रा.डॉ. प्रकाश मसुरकर यांच्यासह स्पोर्ट्स कमिटी सदस्य - प्रा.अजित कानशिडे, प्रा. एस.एस.चव्हाण, प्रा.आर के. सावंत, प्रा. गीताश्री ठाकूर, प्रा. काजल मातोंडकर व क्रीडा प्रशिक्षक क्रिस्टन रोड्रिक्स उपस्थित होते. प्राचार्य लोखंडे म्हणाले, या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून क.म.शि.प्र. मंडळ आणि महाविद्यालयीन प्रशासन नेहमी प्रयत्नशील असते.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी काम करीत आहेत. या महाविद्यालयातील पुण्यात त्यांनी अनेक विषयांमध्ये कामगिरी केली आहे.तसेच आतापर्यंत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी कला-क्रीडा क्षेत्रातही जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध चमकल्या आहेत, असे त्यांनी सांगून आमच्या या महाविद्यालयाला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. या महाविद्यालयासारखे कोकणातील अन्य कुठल्याही महाविद्यालयात बॅडमिंटन स्टेडियम नसल्याचे त्यांनी सांगितले. श्रीm नाईक म्हणाले, या स्पर्धेत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील एकूण ३३ महाविद्यालयांचा समावेश आहे.१०६ विद्यार्थी व ६० विद्यार्थिनी मिळून एकूण 166 स्पर्धकांचा सहभाग आहे.२९ सप्टेंबर रोजी या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे, तर 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगून मुंबई विद्यापिठाच्या कोकण विभागीय व अन्य महाविद्यालयीन स्पर्धाबाबत माहिती दिली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी कोकण विभाग क्रीडा समितीचे सचिव प्रा.चंद्रकांत नाईक व संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा ॲड निलंगी रांगणेकर याची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विभागीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडूंना विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.या स्पर्धेला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, क्रीडाप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.